आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावासाठी अपात्र उमेदवारांनाही कुलसचिव पदाचे इंटरव्ह्यू कॉल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी २७ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४ अर्ज प्राथमिक छाननीत बाद झाले. उर्वरित २३ अर्ज डॉ. महेंद्र शिरसाठ, प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि डॉ. वंदना हिवराळे यांच्या छाननी समितीसमोर आले. छाननी समितीने त्यापैकी डॉ. यशवंत खिल्लारे, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. प्रदीप जबदे, डॉ. दिलीप गरूड, डॉ. अशोक काकडे, डॉ. पंढरी विभूते, डॉ. पी. आर. रोकडे, डॉ. प्रदीप दुबे आणि डॉ. चंद्रकात जाधव या १० जणांचे अर्ज योग्य ठरवले, तर डॉ. कैलास पाथ्रीकर (विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष), डाॅ. रवी सरवदे (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक), ईश्वर मंझा (उपकुलसचिव), डॉ. दिनेश कांबळे (मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव), डॉ. विद्या गवळी, डॉ. सुहास मोराळे, डॉ. सुरेंद्र बहिरट, डॉ. साहेबराव नाईकवाडे, डॉ. शेखर जागडे आणि डॉ. राजूसिंग चव्हाण या १० जणांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. समितीचे काम केवळ आलेली कागदपत्रे तपासणे हे असते. त्यांची सत्यता पडताळण्याचे काम प्रशासनाला करावे लागते. यामुळे या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी समितीने प्रशासनाला केली होती.

प्रशासकीय स्तरावर निर्णय घेऊन सर्वच अर्जदारांना परीक्षा आणि मुलाखतीला बोलावले असल्याचे कुलगुरू डाॅ. चोपडे यांना माहिती आहे; मात्र, हे कशासाठी करण्यात आले, याची त्यांना कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुलगुरूंना केली तक्रार
समितीच्या भूमिकेनंतर काही उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता केली, तर काहींनी लगेच कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे तक्रार केली. कुलगुरूंनी हे प्रकरण पुन्हा छाननी समितीसमोर ठेवले. समितीने त्यांचे अर्ज वैध ठरवण्यास साफ नकार दिला. आम्हाला ही कागदपत्रे परिपूर्ण वाटत नाहीत. यामुळे ‘Subjected to the documents verified by the administration’ असा शेरा मारून समितीने आपली जबाबदारी पार पाडली. आपण प्रशासकीय स्तरावर निर्णय घेऊन आमचा निर्णय बदलू शकता, असेही समितीने स्पष्ट केले.

लॅब टेक्निशियन पदाचा अनुभव जोडला
कुलसचिव पदासाठी शिक्षक संवर्गातून आलेल्या उमेदवाराला ८ वर्षे सहयोगी प्राध्यापक पदासह एकूण १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे, तर प्रशासकीय संवर्गातून येणाऱ्यांना ८ वर्षे उपकुलसचिव पदाच्या कामासह एकूण १५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. मंझा यांचा अनुभव या निकषातच बसत नाही.

>हे निकष पूर्ण करण्यासाठी ईश्वर मंझा यांनी पाचोडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील लॅब टेक्निशियन पदाचा ४ वर्षांचा अनुभव दाखवला आहे. पण याची वेतनश्रेणी आणि अनुभव प्रमाणपत्र जोडलेले नाही. मुळात लॅब टेक्निशियन हे वर्ग-३ चे पद आहे. हा अनुभव कुलसचिव पदासाठी चालत नाही. छाननी समितीने यावर अाक्षेप घेतला होता. नियमाप्रमाणे कुलसचिव पदासाठी किमान उपकुलसचिव किंवा सहायक कुलसचिव पदाचा अनुभव आवश्यक आहे.
>मंझा यांचे योग्य, अयोग्य अनुभव गृहीत धरले तरी ते पूर्ण १५ वर्षे भरत नाहीत. म्हणजेच नियमाप्रमाणे ते अर्ज दाखल करण्यासच अपात्र होते.

भाऊ आला धावून
अर्ज बाद होणाऱ्यांपैकी एक असलेले ईश्वर मंझा यांचे लहान भाऊ डॉ. गणेश मंझा विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आहेत. त्यांनी भावाला मदत करण्यासाठी प्रशासकीय निर्णय घेतला. एकट्या भावाचा अर्ज पात्र करण्याचा ठपका बसू नये यासाठी अर्ज बाद झालेल्या सर्वच १० उमेदवारांना पात्र ठरवले. त्यांना मुलाखतीचे कॉल लेटर पाठवले. अशा पद्धतीने पात्र व अपात्र असे सर्व उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत. बुधवार, २२ जुलै रोजी याबाबत लेखी परीक्षा, प्रेझेंटेशन व मुलाखती आहेत.

सर्वच नियम धाब्यावर
थोरल्या भावाच्या मदतीसाठी प्रभारी कुलसचिव प्रा. गणेश मंझा यांनी अनेक नियम धाब्यावर बसवले आहेत. ईश्वर मंझा हे केवळ अनुभवातच कमी नसून त्यांच्यावर भादंविच्या ४२० कलमान्वये फसवणुकीचा गुन्हाही दाखल आहे. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याप्रमाणे अशा कर्मचाऱ्यांना महत्त्वाची पदे भूषवता येत नाहीत, पण याकडे डोळेझाक करत ईश्वर मंझा यांना कॉल लेटर पाठवण्यात आले.

थेट सवाल
डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना कुलसचिव पदाच्या मुलाखतीचा कॉल केले आहे का?
प्र. तुम्ही नेमके कोणाविषयी बोलताय?
ईश्वर मंझा यांच्यावर विद्यापीठानेच तक्रार दाखल केली अाहे.
प्र. हे सर्व मी येण्यापूर्वी घडलेले आहे. मला कोणीच माहिती दिली नाही.
आम्ही जे सांगतोय त्याचे कागदोपत्री पुरावे आहेत.
प्र. (कुलगुरूंनी या प्रकरणासंबंधीची फाइल ताब्यात घेतली.) तुमच्याकडूनच हे कळते आहे. ही बाब खूप गंभीर आहे.
मंझा यांनी पीएचसीचा अनुभव जोडला आहे. तरी एकूण अनुभव कमी भरतोय.
प्र. मला थोडा वेळ द्या. मी या फाइलचा अभ्यास करतो. मग योग्य निर्णय घेतो. कोणत्याही परिस्थितीत कुलसचिव पदावर योग्य व्यक्तीच बसवू.

मंझांकडून प्रतिसाद नाही
या संदर्भात बाजू समजून घेण्यासाठी ईश्वर मंझा यांना अनेकदा फोन केला. एसएमएसदेखील पाठवले. मात्र, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांची भूमिका काय आहे, हे समजू शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...