आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता सर्वच व्हाइट टॉपिंग रस्त्यांबाबत आयुक्तांचा निर्धार, आधी दर्जा तपासणार, मगच बिल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात कोट्यवधी रुपये खर्चून व्हाइट टॉपिंग रस्ते करण्यात आले. त्यात अनेक मूलभूत तांत्रिक उणिवा राहिल्या. ३०  वर्षे दूरच ३० महिनेही हे रस्ते टिकतात की नाही, अशा या चुका डीबी स्टारने चव्हाट्यावर आणल्या. तत्कालीन मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि अभियंत्यांसह पाहणी करून सर्व मूलभूत चुका दुरुस्तीचे आदेश दिले. पण त्यांची बदली होताच ही कामे लटकली. नवे आयुक्त बकोरिया रुजू होताच डीबी स्टारने सर्व कात्रणांसह खराब रस्त्यांची यादी मनपाला दिली. इतक्यात जीएनआय कन्स्ट्रक्शनच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले आहे. डीबी स्टारने इतर रस्ते व ठेकेदारांबाबत सवाल उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी या सर्वच रस्त्यांच्या कामाची चौकशी लावल्याचे सांगितले. आधी या सर्व रस्त्यांचा दर्जा तपासणार आणि मगच बिल देणार, असा निर्धारच त्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला आहे.

व्हाइट टॉपिंग रस्त्यांमधील तांत्रिक चुका डीबी स्टारने उघड केल्या. शोल्डर फिलिंग नसणे, हनिकॉब, स्लोप विरुद्ध दिशेला असणे, फिनिशिंगअभावी वाहन जंप होणे अशा या चुका होत्या. यासह शहरातील इतरही सिमेंट रस्त्यांमध्ये ठेकेदारांनी केलेली धूळफेक चमूने समोर आणली. त्याची दखल आयुक्त केंद्रेकर यांनी घेतली. त्यानंतर प्रभारी शहर अभियंता सिकंदर अली यांनी रस्त्यांची पाहणी करून दुरुस्त्या सुचवल्या. अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे छोटी कामे केली, मात्र मोठी कामे तशीच ठेवली. आयुक्तांनी सूचना देऊनही थातूरमातूर दुरुस्ती करत अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कामे अजूनही केलेली नव्हती. 

आदेशाला खो : एवढे होऊनही ठेकेदारांना मनपाने ना नोटिसा बजावल्या ना  दंड वसूल केला. त्यामुळे ओमप्रकाश बकोरिया यांना मनपाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच चमूने वृत्तमालिकेची कात्रणे त्यांच्याकडे दिली. याच मुद्द्यांचा धागा पकडून आयुक्तांनी बांधकाम विभागात धूळ खात पडलेला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अहवाल मागितला. डीबी स्टारच्या वृत्तावर शिक्कामोर्तब करत दिलेल्या यादीप्रमाणे  पुण्याच्या महाविद्यालयामार्फत १५ रस्त्यांची  तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

बिल नामंजूर: ज्योतीनगरातील व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यामधील  तांत्रिक चुका डीबी स्टारने मुंबईच्या एका महिला अभियंत्यामार्फत चव्हाट्यावर आणल्या होत्या. त्याच रस्त्यापासून आयुक्तांनी  तपासणी केली. गेल्याच आठवड्यात त्याचा अहवाल आला. त्यानंतर शनिवारी लेखा विभागातून गुरूनानक एजन्सीने तयार केलेल्या याच रस्त्याचे बिल अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे येताच त्यांनी उशिरापर्यंत बांधकाम विभागातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि जीएनआयला काळया यादीत टाकण्याचा निर्णय घेतला.
 
या रस्त्यांचीही होणार चौकशी
- जे. पी. कन्स्ट्रक्शन : पैठणगेट ते क्रांतीचौक, सिद्धार्थचौक ते उद्धवराव पाटील चौक, मुकुंदवाडी गाव, लेमन ट्री ते शरद टी पॉइंट, लिटिल फ्लॉवर ते भावसिंगपुरा, भाजीवाला चौक उस्मानपुरा ते आनंद गाडे चौक, रमानगर, शरद टी पॉइंट ते टीव्ही सेंटर. सतीश पेट्रोल पंप ते सावरकर चौक, सिडको एन-४ नाईक कॉम्प्लेक्स ते अहिल्याबाई होळकर चौक, स्टेट बँक चौक ते जकात नाका
- आर. के. कन्स्ट्रक्शन : हॉटेल सनी ते ओंकार गॅस.
- गुरुनानक इन्फ्रास्ट्रक्चर : महालक्ष्मी चौक ते कामगार चौक, संत तुकोबानगर ते कासलीवाल पॅव्हेलियन, सेव्हन हिल्स ते सूतगिरणी चौक, जयभवानी चौक ते गजानन मंदिर चौक

पुढील स्लाइडवर पाहा परिणाम दिसेपर्यंत पाठपुरावा...
बातम्या आणखी आहेत...