आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Question Of Security: State Police Weapons Outdated

प्रश्‍न सुरक्षेचा: राज्यभरातील पोलिसांची नव्वद टक्के शस्त्रास्त्रे कालबाह्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दहशतवादी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करत असताना राज्यातील 90 टक्के पोलिस मात्र कालबाह्य व अप्रमाणित शस्त्रे वापरत असल्याचा दावा लातूर आर्मोर शाखेतील निवृत्त सहायक फौजदार पांडुरंग रामा गायकवाड यांनी केला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी 1993 पासून आजवरच्या गृहमंत्री तसेच राज्यपालांशी पत्रव्यवहारही केला आहे. परंतु त्यांना एकदाही प्रतिसाद मिळाला नाही.गेल्या 57 वर्षांपासून पोलिसांच्या सुमारे तीन लाख शस्त्रांची देखभाल करण्यासाठी केवळ 577 आयुधिक (शस्त्रांची देखभाल करणारा पोलिस कर्मचारी) असल्याने 12 वर्षांपेक्षा जुनी शस्त्रे आजही वापरली जात आहेत. यामुळे वेळप्रसंगी पोलिसांच्या बंदुकीतून गोळी सुटेल की नाही याची शाश्वती नाही. महाराष्‍ट्र पोलिस नियमावली 1959 भाग 2 नियम 30 अन्वये शस्त्रांचे आयुर्मान 12 वर्षे ठरवलेले आहे. त्यानंतर ही शस्त्रे वापरायची असल्यास अधिकृत वरिष्ठ तज्ज्ञ अधिकारी म्हणजे इलेक्ट्रिक मेकॅनिकल असिस्टंट इंजिनिअर ऑफ स्मॉल आर्म्स (ईएमएई, एसए) यांच्याकडून प्रमाणित करणे अनिवार्य आहे.

प्रत्येक आयुक्तालय अथवा पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमणे बंधनकारक आहे. परंतु मुंबई वगळता महाराष्‍ट्रात इतरत्र कुठेही असा अधिकारी नेमलेला नाही.
राज्यस्तरावर 1996 पर्यंत पुणे येथील मुख्य शस्त्र निरीक्षण विभागात पोलिस अधीक्षक गिरिराज सिंह कार्यरत होते. परंतु त्यांच्या निवृत्तीनंतर या पदावर आजवर कोणीही अधिकारी नेमला गेला नाही.


काय करायला हवे ?
पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्मोर शाखेत तज्ज्ञांची नियुक्ती व्हावी. त्यांनी प्रमाणित केलेली शस्त्रेच पोलिसांना दिली जातील. जेणेकरून पोलिस, जनसामान्यांना धोका निर्माण होणार नाही.


पद भरण्याची शिफारस
पोलिस आयुक्तालयातील आर्मोर शाखेत पोलिस उपनिरीक्षकपद भरण्यात यावे याबाबतचे शिफारसपत्र महिनाभरापूर्वी पोलिस महासंचालकांना पाठवण्यात आले आहे, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
संजयकुमार, पोलिस आयुक्त.


आजवर घडलेले अपघात
> 8 नोव्हेंबर 1998 : पडेगाव फायरिंग बटावर रायफलचा स्फोट. एक जखमी.
> 9 नोव्हेंबर 1998 : पडेगाव फायरिंग बटावर बंदुकीचा स्फोट. दोघे जखमी.
> 17 सप्टेंबर 2000 : लातुरात मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मानवंदना देताना गोळी झाडली गेली नाही.
> 26 नोव्हेंबर 2008 : मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसवर दहशतवाद्यांचा पाठलाग करताना गोळ्या सुटल्या नाहीत.
> 28 नोव्हेंबर 2011 : जालना येथील प्रशिक्षणार्थी पोलिस गोळीबाराचा सराव करत असताना 30 एसएलआर रायफल निकामी झाल्या.
> 17 सप्टेंबर 2007 : औरंगाबादेत मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मानवंदना देताना रायफल वर गेली असताना गोळीच झाडली गेली नाही. मात्र रायफल खाली घेत असताना हीच गोळी अचानक सुटली व तत्कालीन महापौर किशनचंद तनवाणी यांच्या कानशिलाजवळून गेली.