बिडकीन - आघाडी शासनाने विकासाची अनेक कामे पूर्ण केली आहेत. सिंचनासाठी केवळ 20 हजार कोटी रुपये खर्च केले. विरोधक मात्र 70 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे सांगत आहेत, असे कसे शक्य आहे, असा सवाल गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बिडकीन येथे विरोधकांना विचारला. एन्रॉन बुडवू, दाऊदला आणू, असे म्हणणा-यांनी दाऊदने वापरलेला रुमाल तरी जप्त केला का, असाही सवाल त्यांनी केला.
बिडकीन येथे 18 कोटी खर्चाच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या वेळी आमदार संजय वाघचौरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे बिडकीन परिसरात होऊ घातलेल्या स्मार्ट सिटीचा पाणीप्रश्न मिटणार असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. औरंगाबाद-पैठण रोडच्या चौपदरीकरणाचा प्रश्न मात्र रेंगाळतच राहिला, अशी खंतही पाटील त्यांनी व्यक्त केली. मात्र, बिडकीन पोलिस ठाण्याची इमारत लवकरच पूर्ण होईल, असेही पाटील यांनी सांिगतले. पाटील यांच्या हस्ते टाकळी अंबड येथील 33 केव्ही केंद्राचे उद्घाटनही झाले.