आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचे पैसे मोजत असताना चोर नागरिकांच्या नजरेस पडला अन् जाळ्यात अडकला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दीड वर्षापासून घरकाम करणाऱ्याने मालकाच्या घरात डल्ला मारत तीन लाख रुपये चोरले. ही रक्कम तो श्रीकृष्णनगरातील खुल्या जागेत बसून एका पिशवीतून सॅकमध्ये टाकत असताना नगरसेविका पती आणि नागरिकांनी त्याला पाहिले. मग त्यांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरी केल्यानंतर अवघ्या सात तासांत चोरटा नारायण केवट (रा. मध्य प्रदेश) गजाआड झाला. खडकेश्वर भागात राहणारे पेट्रोलपंप चालक मुकुंद गट्टाणींकडे काम करणारा नारायण आईची प्रकृती बिघडल्याचे सांगून 19 जुलै रोजी सुटीवर गेला. मंगळवारी तो परतला आणि गट्टाणींना काहीही सांगता थेट तिसऱ्या मजल्यावर जाऊन बसला. पंपावर जमा होणारी रक्कम गट्टाणी रोज कुठे ठेवतात, हे त्याला ठाऊक होते. त्याने पहाटे चारच्या सुमारास तीन लाख रुपये ठेवलेली बॅग चोरून पोबारा केला. घराबाहेर पडताच एका पोत्यात त्याने नोटा भरल्या. तो सकाळी साडेदहाच्या सुमारास निरंजन सोसायटी, श्रीकृष्णनगर येथील दत्त मंदिरानजीकच्या खुल्या जागेत बसून पोत्यातील नोटा सॅकमध्ये टाकत होता. नगरसेविका अर्चना नीळकंठ यांचे पती शैलेंद्र नीळकंठ यांनी त्याला पाहून आरडाओरड केली. लोकही धावून आले. तेव्हा नारायण रामतारा सोसायटीजवळ असलेल्या एका नाल्यातील पाईपमध्ये जाऊन लपून बसला. तेथे लोकांनी त्याला घेरून दक्षिणमुखी मारुती मंदिरात डांबले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. 
 
दुसरी घटना: धान्याच्या कोठीतील चाव्या काढत कपाटातून चोरले सोने... 
झांबड इस्टेट (श्रेयनगर) येथील रहिवासी केशव गजानन जोशी (४९, रा. झांबड इस्टेट) यांच्या घरात 16 आॅगस्ट रोजी पहाटे शिरलेल्या चोरट्यांनी 60 हजार रुपयांचे दागिने आणि 20 हजार रुपये रोख पळवले. जोशी यांनी धान्याच्या कोठीत ठेवलेल्या कपाटाच्या चाव्या काढून चोरट्यांनी हात साफ केला. त्यानंतर चोरट्यांनी समोरच्या काॅलनीतील एका घरात शिरण्याचाही प्रयत्न केला. मात्र, शेजाऱ्यांनी आरडाओरड केल्याने ते पळाले. महिनाभरापूर्वी याच परिसरातील एका डाॅक्टरचे घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने पळवले होते. गेल्या वीस दिवसांतील ही पाचवी घरफोडी आहे. 

रेणुकामाता मंदिरासमोर राहणारे आणि तीर्थपुरी येथे शेती करणारे जोशी स्वातंत्र्यदिनाची सुटी असल्याने कुटंुबासह अंबाजोगाईला देवीच्या दर्शनासाठी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे लोखंडी आणि लाकडी दरवाजाचे कुलूप तोडले. स्वयंपाकघर हॉलमध्ये चीजवस्तू नव्हती. मग त्यांनी वरच्या मजल्यावरील धान्याच्या कोठ्या पाहिल्या. त्यात ठेवलेल्या कपाटाच्या चाव्या काढून अडीच तोळ्यांचे सोन्याचे नेकलेस आणि रोख 20 हजार रुपये पळवले. बुधवारी दुपारी ११ च्या सुमारास जोशी गावाहून परतल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीशकुमार टाक, उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 

मुलीच्या महाविद्यालयाची फीसही गेली
जोशींचीदोन मुले, एक मुलगी आणि पत्नी औरंगाबादेत राहतात. एमसीएचे शिक्षण घेणाऱ्या मुलीची फी भरण्यासाठी त्यांनी वीस हजार रुपये घरी आणून ठेवले होते. प्रारंभी त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु त्यांच्या पत्नीने साड्यांमध्ये ठेवलेले दीड तोळे सोने आणि काही रक्कम तशीच होती. पळवलेले सोने 15-20 वर्षांपूर्वीचे असल्याने त्यावेळच्या भावानुसार तक्रारीत नोंद होते. त्यामुळे सध्या ८० हजार रुपयांचा एेवज चोरीस गेल्याचे म्हणता येईल, असे पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके म्हणाले. 

जोशी यांचे घर फोडल्यानंतर चोरट्यांनी मीनाताई ठाकरे सभागृहासमोरील विश्वंभर देशमुख यांचे घर फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु शेजाऱ्यांनी आरडाओरड केल्याने त्यांनी स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी गज, पकड आदी तेथेच ठाकून पळ काढला. देशमुख त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला गेले असल्याचे पोलिसांनी सांिगतले. सध्या ८० पाेलिस वाहने रात्री गस्तीवर असल्याचे सांगितले जात असतानाही घरफोडी वाढल्याने गस्तीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...