आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यात रब्बी पिकांवर बंदीची छाया, पिण्‍याच्या पाण्‍यासाठी उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ असे गांभीर्याने म्हणण्याची वेळ औरंगाबादकरांवर आली आहे. ऑक्टोबरअखेर जोरदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरणीवर बंदी येऊ शकते. पुढील 9 महिने पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहावे यासाठी हा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी दिले आहेत. त्याहीपेक्षा चिंताजनक बाब म्हणजे जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही तर उन्हाळ्यात औरंगाबादकरांना पिण्याचे पाणी मिळणार नाही.

पुढील दोन महिने म्हणजे ऑक्टोबरपर्यंत पुरेल इतका जिवंत साठा जायकवाडीत आहे. त्यानंतर मृतसाठय़ावर दिवस कंठावे लागतील. शहराबरोबरच औरंगाबाद, फुलंब्री, पैठण आणि गंगापूर या तालुक्यांना यातूनच पाणी द्यावे लागणार असल्याने हा मृतसाठा किती दिवस साथ देईल, हे आजघडीला सांगता येत नाही. गतवर्षीपेक्षा यंदाची परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याने करावे तरी काय, असा प्रश्न प्रशासनासमोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कारण गरज पडल्यास केंद्राकडून हजार कोटी रुपयांचे पॅकेज मिळेल, पण पाणी आणायचे कोठून याचे उत्तर नाही. जिल्ह्याची लोकसंख्या 37 लाखांवर पोहोचली असून रेल्वेने आणलेले पाणी किती जणांना देणार अशा प्रश्नांमुळे प्रशासनातील कर्तेधर्ते चिंतातुर असून तेही पावसासाठी देवाचा धावा करत आहेत. यंदा वैजापूर तालुक्यात सरासरीच्या 56 टक्के, गंगापूरमध्ये 55 टक्के, तर पैठण तालुक्यात 52 टक्के एवढा पाऊस झाला.


जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी- 675 मिमी
315 मिलिमीटर गतवर्षी झालेला पाऊस

450 मिमी यंदा आतापर्यंत झालेला पाऊस

700 मिलिमीटर यंदाची किमान गरज


तूट भरणे कठीण
अजून 350 मिलिमीटर पाऊस झाला तरी गतवर्षीचा राहिलेला पावसाचा तुटवडा भरून निघणार नाही. त्याहीपेक्षा जास्त पावसाची यंदा गरज आहे. ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस झाला तरच रब्बी पिकांवर बंदी घालण्याचे संकट टळू शकेल. त्यामुळे गतवर्षीपेक्षा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागण्याची प्रशासनाला भीती आहे.


ऑक्टोबरमध्ये निर्णय!
0 यापुढे पाऊस न झाल्यास रब्बी पिकांना शासनाकडून अधिकृत बंदी घातली जाऊ शकते.
0 कमी पाणी असताना रब्बी पिके घेतली तर जमिनीतील पाण्याचा उपसा होईल. भूगर्भातील पाणी संपून जानेवारीनंतर टंचाई निर्माण होईल.
0पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याच्या दृष्टीने बंदीवर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो.


जिल्ह्यातील रब्बी पिके
गहू, हरभरा, सूर्यफूल, करडी, शाळू, ज्वारी, (पाणी उपलब्धतेच्या ठिकाणी उन्हाळी भुईमूग)
पाण्यासाठी गतवर्षाचे हाल लोक पाऊस पडताच विसरून गेले. जल पुनर्भरण झालेले नाही. अजून वेळ गेलेली नाही. गाव तेथे गाव तळे, शेत तेथे शेततळे, घर तेथे पुनर्भरण, नाला तेथे बंधारा याचे पालन केले तर ठीक, अन्यथा भवितव्य अंधकारमय आहे. ’’ डॉ. दत्ता देशकर, जलतज्ज्ञ.


परिस्थिती गतवर्षीपेक्षाही गंभीर आहे. या महिन्यात पावसाची अपेक्षा आहे. यापुढे मोठा पाऊस झाला नाही तर कठोर उपाय करावे लागतील. जमिनीतील पाणी पुढील 9 महिने पुरवण्यासाठी योग्य त्या सर्व योजना करणे अपरिहार्य आहे. त्याला पर्याय नाही.’’ विक्रमकुमार, जिल्हाधिकारी.