आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रब्बीचा गहू बाजारात; भाव 5 1911

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी 73 क्विंटल तर मंगळवारी 10 क्विंटल नवीन गव्हाची आवक झाली. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने गव्हाला सध्या 1911 ते 2 हजार 41 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मात्र, या पुढील काळात गव्हाची आवक वाढून भाव कमी होणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गतवर्षी पडलेल्या दुष्काळात गव्हाची पेरणी केवळ 31 टक्केच झाली होती. या क्षेत्रातून हेक्टरी 12 ते 13 क्विंटल जेमतेम उत्पादन मिळाले. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकर्‍यांकडे मुबलक प्रमाणात गहू उपलब्ध नव्हता. परिणामी बाजारातील गव्हाच्या किमती 2 हजार ते 3200 रुपयांवर पोहोचल्या होत्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून शहरात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब आदी राज्यातून दररोज 100 टन गव्हाची आयात करण्यात येत आहे. मात्र पुरवठय़ाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने गव्हाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. आता नवीन गहू बाजारात दाखल झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
हेक्टरी 15 ते 16 क्विंटल गहू
या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार मान्सून बरसला. त्यामुळे खरिपाची पेरणी वेळेवर होऊन काढणीही लवकर झाली. त्या खाली झालेल्या क्षेत्रावर पुढील पाणीटंचाई लक्षात घेता सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात रब्बी गव्हाची पेरणी केली होती. त्याची काढणी नुकतीच करण्यात आली आहे. हेक्टरी 15 ते 16 क्विंटल सरासरी उत्पादन झाले. कचरू डुगले, शेतकरी, सोनगाव
गव्हाचे उत्पादन विक्रमी
गतवर्षी हेक्टरच्या केवळ 31 टक्केच पेरणी झाली होती. यंदा पर्जन्यमान चांगले झाले. त्यामुळे 92 टक्के गव्हाची पेरणी झाली. उत्पादनही 15 ते 16 प्रतिहेक्टर होईल. त्यामुळे यंदा गव्हाचे उत्पादन विक्रमी होऊन भाव समतोल राहण्यास मदत होईल. सतीश शिरडकर, प्रकल्प उपसंचालक, आत्मा.
भाव अजून कमी होतील
नवीन गव्हाची आवक सुरू झाली आहे. दोन दिवसांत 83 क्विंटल गहू विक्रीसाठी आला. त्याला 1900 ते 2 हजार 41 रुपयांपर्यंत भाव मिळाला. येथून पुढे आवक वाढून भाव कमी होतील. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. नानासाहेब आधाने, सचिव, जिकृउबा समिती
शरबतीचा मान कायम
आपल्याकडे अजित, लोकवण, 496 या गव्हाची वाण पेरली जाते. त्याला बाजारात 1700 ते 2200 रुपयांपर्यंत भाव मिळतो. पण मध्य प्रदेशात पिकणार्‍या शरबती गव्हाला आपल्याकडे 2700 ते 3200 रुपये भाव मिळतो. शरबती गव्हाच्या वाणाची आपल्याकडे पेरणी होत नसल्यामुळे शरबती गव्हाचे भाव 2400 ते 2700, किरकोळ बाजारात 3200 पर्यंत कायम राहण्याची शक्यता बाजार समितीचे प्रमुख संतोष गायकवाड यांनी वर्तवली आहे.