आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफ कॉलनीत बंडखोरांची संख्या वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्लिम समाजाचे लक्ष लागलेल्या शरीफ कॉलनी, वॉर्ड क्रमांक ४३ मध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीनच्या (एमआयएम) उमेदवारासमोर तगडे आवाहन असणार आहे. या वॉर्डामध्ये एमआयएमने बंडखोरीच्या भीतीमुळे मुजीब आलम खान यांना गणेश कॉलनी, वॉर्ड क्रमांक २५ मध्ये उमेदवारी दिली. शरीफ कॉलनीत अजीम अहेमद खान यांना उमेदवारी दिली. मात्र, येथे एमआयएमच्या उमेदवाराविरुद्ध दोन माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात उभे राहण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडून इच्छुक इसाक अंडेवाला यांना उमेदवारी मिळाली तर येथील लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

शरीफ कॉलनी हा वॉर्ड २०१० मध्ये महिलांसाठी राखीव होता. येथून अपक्ष उमेदवार करिमुन्नीसा बेगम जमील खान या निवडून आल्या होत्या. यंदा हा वॉर्ड सर्वसाधारण असल्यामुळे येथे मोठी चुरस िनर्माण झाली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक मुजीब आलम खान यांचा रोशन गेट वॉर्ड क्रमांक ४२ हा महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे ते शरीफ काॅलनीतून एमआयएमकडून इच्छुक होते. त्याचबरोबर माजी नगरसेवक िनसार अहेमद खान, फजल उल्लाह तसेच अजिम खान हे ितकिटासाठी इच्छुक होते. त्यामुळे मुजीब आलम खान यांना येथून उमेदवारी न देता अजिम खान या बड्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली.
काँग्रेसकडून इसाक अंडेवाला हे इच्छुक असून त्यांचीही उमेदवारी जवळपास निश्चित आहे. नाराज उमेदवारांनी अपक्ष लढण्याची जोरदार तयारी सुरू केल्यामुळे येथून एमआयएमला फटका बसू शकतो, असा अंदाज जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे. शरीफ कॉलनीत एकूण ९ हजार ८३४ मतदार आहेत. या वॉर्डात माजी नगरसेवक निसार अहेमद खान यांच्या नात्यागोत्यातील बरेच मतदार असल्यामुळे त्यांनी एमआयएमच्या विरोधात अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली तर त्याचा फटका एमआयएमला बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत निसार खान, माजी नगरसेवक फजल उल्लाह यांनी एमआयएमसाठी काम केले होते. त्यामुळे त्यांना एमआयएमकडून तिकीट मिळेल, अशी आशा होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलल्यामुळे ते काय भूमिका घेतात यावर एमआयएमचा निकाल अवलंबून राहील. निसार खान आणि फजल उल्लाह हे दोन्ही माजी नगरसेवक स्वत: अपक्ष न लढता काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करून एमआयएमला धडा शिकवू शकतील, अशाही हालचाली ऐन वेळेवर होऊ शकतात. मात्र, एमआयएम नाराजांना कसे रोखणार यावरही बरेच काही अवलंबून आहे.

अशी आहे वॉर्डाची हद्द
किराडपुरा, मुजीब कॉलनीचा काही भाग, आझम कॉलनी, पूर्वला किराडपुरा रोशन मशीद ते मनपा रोशन फंक्शन हॉलपर्यंत, उत्तरेला कटकट गेटजवळील समी एसटीडी ते सय्यद गनी यांच्या घराजवळील नाल्यापर्यंत दक्षिणेला शेख नबी पटेल यांचे घर ते अब्बास हॉलपर्यंत. उत्तरेला रवींद्रनगर टी जंक्शनपासून समी एसटीडीपर्यंत.
वाचा... संभाव्य'बंडोबां'साठी सर्वेक्षणाचा हवाला