आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् त्याच्या माता-पित्याचा जीव भांड्यात पडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तुम्ही ताबडतोब या. इथे उपचार होतील; पण तातडीने आला नाहीत, तर उपलब्ध असलेले सहा इंजेक्शन्स संपून जातील, असा निरोप डॉक्टरांनी दिला आणि काकडे कुटुंबीय, मित्रपरिवाराची एकच धावपळ उडाली. रात्रभर प्रवास करून त्यांनी चिमुकल्या हृषीकेशला घेऊन नवसारी (गुजरात) गाठले. सुदैवाने इंजेक्शन उपलब्ध होते. हृषीकेशवर उपचार झाले. तो धोक्यातून बाहेर पडल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिला अन् त्याच्या माता-पित्याचा जीव भांड्यात पडला. तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रेबीजचे इंजेक्शन मिळाले. मात्र, त्यासाठी गुजरात गाठावे लागले, याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

न्यू हनुमाननगर येथे राहणारे शंकर काकडे बजाजनगर, वाळूज येथे एका कंपनीत कर्मचारी आहेत. त्यांच्या मुलावर म्हणजे हृषीकेशवर आठ मे रोजी कमलनयन बजाज रुग्णालयाच्या मागे मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. त्याच्या डोक्यालाच चावे घेतले. त्याची जखम मेंदूपर्यंत पोहोचली होती. पाटील यांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात हलवले. तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू केले. मात्र, श्वानदंशावर जालीम मानले जाणारे ह्युमन इंजेक्शन उपलब्ध नव्हते. ते दिले नाही तर हृषीकेशला पुढे चालून रिअ‍ॅक्शन होऊ शकते, असे सांगण्यात आले. हे इंजेक्शन शोधण्यासाठी मग त्यांनी शहरातील सर्व रुग्णालये पालथी घातली. औषधी विक्रेत्यांकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना एकतर इंजेक्शन उपलब्ध नाही किंवा साडेआठ हजार रुपये मोजले, तर मागवून देऊ, अशी उत्तरे मिळाली.

काकडे यांनी नातेवाइकांच्या मदतीने जालना, परभणी येथे इंजेक्शनचा शोध घेतला. घाटी रुग्णालयाशीही संपर्क ठेवला. मात्र, कुठूनही सकारात्मक उत्तर मिळत नव्हते. कंपनीतील सहकारी किशोर पाटील यांच्याकडे विचारणा केली. पाटील यांनी माझ्या ओळखीचे काही डॉक्टर गुजरातेत आहेत. त्यांच्याकडे चौकशी करतो, असे सांगत काकडेंना धीर दिला. अहमदाबाद, सुरतला विचारणा केली, तेव्हा नवसारी येथील महात्मा गांधी सरकारी रुग्णालयात इंजेक्शन असल्याचे कळाले. मग तातडीने सूत्रे हलवत हृषीकेशला नवसारीत नेले. केवळ पाच रुपयांत इंजेक्शन मिळाले. दोन दिवस त्याच्यावर उपचार झाल्यावर १३ मे रोजी काकडे कुटुंबीय शहरात परतले.

गरिबांचे काय?
यासंदर्भात पाटील म्हणाले की, रुग्णसेवेचे समाधान आहे. मात्र, या इंजेक्शनचा घाटी रुग्णालयात तुटवडा असणे वेदना देणारे आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकाराची दखल घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे. शंकर काकडे म्हणाले की, माझ्याकडे तुटपुंजी का होईना रक्कम होती. म्हणून मुलाला नवसारीपर्यंत नेता आले. मात्र, ज्यांच्याकडे पैसाच नाही अशा रुग्णांचे तर काही खरे नाही. त्यांचा विचार घाटी प्रशासनाने करायलाच हवा.
बातम्या आणखी आहेत...