आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rabindranath School,Latest News In Divya Marathi

रवींद्रनाथ शाळेतील आठवी ते दहावीचे वर्ग बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-सर्मथनगर येथील रवींद्रनाथ विद्या मंदिर शाळेतील आठवी ते दहावीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला आहे. व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक-शिक्षकांमधील वादामुळे हा प्रकार घडला असला तरी आरटीईच्या भौतिक सुविधांचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र, यामुळे सुमारे 350 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न बिकट बनला आहे.
सर्मथनगर (बॉइज हॉस्टेल, एमपी लॉ कॉलेजसमोर) येथे व्यंकटेश शिक्षण संस्थेतर्फे रवींद्रनाथ टागोर विद्या मंदिर व रवींद्रनाथ टागोर प्राथमिक विद्यालय चालवले जाते. या भागातील दर्जेदार शिक्षण देणारी शाळा असा नावलौकिकही गेल्या 20 वर्षांत कमावला आहे. शाळा पूर्णपणे अनुदानित आहे. शासनाकडूनच शिक्षकांचे वेतन आणि इतर उपक्रमांसाठी अनुदान दिले जाते. या संस्थेचे विश्वस्त महेंद्र खानापूरकर यांनी आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 15 एप्रिलला जबर धक्का दिला. परीक्षा देऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांच्या हातात त्यांनी एक नोटीसवजा पत्र दिले.
भौतिक सुविधा नाहीत
आरटीईच्या नियमावलीत शाळांमध्ये काही भौतिक सुविधा बंधनकारक केल्या आहेत. त्या आपल्या शाळेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने नोटीस दिली आहे. त्यामुळे या वर्षीपासून (जून 2014) इयत्ता आठवी ते दहावीचे तीनही वर्ग बंद होणार आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना जवळच उपलब्ध असलेल्या शाळांमध्ये समाविष्ट करण्याविषयी जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्‍यांना कळवण्यात आल्याचे पत्रात म्हटले होते. आरटीई 2009 कायद्यानुसार व उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका क्रमांक 16-2013 रिट पिटिशन क्रमांक 6230-2012 नुसार भौतिक सुविधा उपलब्ध न केल्यास शाळेची मान्यता काढण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण संचालकांना दिले असल्याचेही नोटिसीत म्हटले आहे.
अंतर्गत वाद
दोन महिन्यांपूर्वी संस्थाचालकांनी पाच शिक्षकांना शिस्तभंगाचे कारण दाखवून सेवा समाप्तीच्या नोटिसा काढल्या होत्या. तसेच मुख्याध्यापकांकडून जमाखर्चाचे सर्व निर्णय घेण्यात येत असल्याने वाद वाढला होता.
पालक पोहोचले विश्वस्तांकडे
विद्यार्थी नोटिसा घेऊन घरी पोहोचल्यावर पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. नवी, चांगली शाळा केव्हा शोधावी. तेथे प्रवेशासाठी डोनेशन कुठून द्यावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. शिवाय भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळेचे व्यवस्थापन का प्रयत्न करत नाही, असाही सवाल निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी व्यंकटेश शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका, असे त्यांनी आक्रमक होत बजावले. खानापूरकर यांनी 27 एप्रिलला पालकांची एक सभा घेऊन त्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.