औरंगाबाद - आणिवाॅर्डांत औषध फवारणी करणारे ठेकेदार मनपाची नागरिकांची फसवणूक करीत आहेत. ते फवारणी करतात त्यात औषध नव्हे तर पाणीच असते, त्याने मुंगी पण मरत नाही, डास काय मरणार, असा सवाल करीत स्थायी समिती सदस्यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. माणसे मरण्याची वाट पाहू नका, फवारणीचे टेंडर लवकर काढा, सध्याच्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी सदस्यांनी केली.
आज स्थायी समितीच्या बैठकीत डेंग्यू आणि औषध फवारणी या विषयांवरून नगरसेवकांनी आरोग्य विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभे केले. अनिल जैस्वाल यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरताना फवारणीचे काम करणाऱ्या खासगी ठेकेदारांवर मनपाचा अंकुशच नसल्याचा आरोप केला. आणि वाॅर्डात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना, मरण पावत असतानाही हे ठेकेदार काम करीत नाहीत. औषध फवारणी करताना त्यात औषध नाही तर पाणीच असते. त्यांना जाब विचारला जात नाही. त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. माणसे मरेपर्यंत हे असेच चालणार का, असा सवाल त्यांनी केला. नगरसेविका सत्यभामा शिंदे यांनी या औषधाने मुंगी मरू शकत नाही, डास काय मरणार, असा सवाल केला. प्रीती तोतला यांनी ठेकेदारांवर काय कारवाई केली, असा प्रश्न केला. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयश्री कुलकर्णी यांनी सांगितले की, नवीन ठेकेदार नेमण्यासाठी निविदा काढल्या. सध्याच्या ठेकेदारांवर त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आलेल्या निविदांत तेच ठेकेदार आहेत, त्यामुळे विलंब होत असल्याचे त्या म्हणाल्या.
बीओटीवर वादंग
बीओटीच्यारेंगाळलेल्या प्रकल्पांबाबतही नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. ही कामे कधी मार्गी लागणार, असा प्रश्न मीर हिदायत अली, काशीनाथ कोकाटे, प्रीती तोतला, जगदीश सिद्ध यांनी विचारला. कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी औरंगपुरा मंडईचे काम १५ दिवसांनंतर बऱ्यापैकी मार्गी लागेल, असे सांगितले. शहागंजबाबत कोणतेही विधान त्यांनी केले नाही. शहागंज औरंगपुरा मंडईतील विक्रेत्यांना खोटी आश्वासने देत जागा रिकाम्या करून घेतल्या आता काम करण्याचा पत्ता नाही, त्यांची रोजी रोटी काढून घेतली, असा आरोपही सदस्यांनी केला.