आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेपाच वर्षांची राधा चालवते वडील अन् भावाचा प्रपंच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आई,वडील थोरला भाऊ भोळसर. ऐंशीला टेकलेल्या आजीच्या निधनानंतर साडेपाच वर्षांच्या नातीवर पडली प्रपंच सांभाळण्याची जबाबदारी. आई भोळसर असल्याने मामाच्या घरी राहते. वडील भावाला स्वयंपाक येत नाही. राधाने मात्र आश्रमशाळेवर जाऊन पोटाची भूक भागवण्यापुरते अन्न आणून वडील भावाची भूक भरण्यास सुरूवात केली. अख्खं घर जरी भोळसर असले तरी राधाच्या डोळ्यात विलक्षण तेज, गोड हास्य, चुणचुणीतपणा आहे. खरोखर राधाच्या स्वत:सह वडील थोरल्या भावाला जगविण्यासाठीच्या संघर्षाला सलाम केलाच पाहिजे. ज्यांनी छत्र म्हणून वाढवावे , अंगाखांद्यावर खेळवावे, झोके झुलवावे अशांचाच आधार बनण्याची वेळ या वयात राधावर आली आहे. परंतु जेथे इच्छा आहे, तेथे मार्गही सापडतात अशीच चित्तरकथा कचनेर तांड्यावर राहणाऱ्या राधाची आहे. राधाच्या मदतीला धावले आहेत असंख्य हात. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक, कचनेर तांड्यावरील आश्रमशाळा, महाराणा प्रतिष्ठान सातारा देवळाई, डॉ. जीवन राजपूत, शिक्षिका लता काकरवाळ हे सर्व तिला आधार देत आहेत.
कचनेर तांड्यावर एक मुलगी कॅरीबॅग अडकवून शाळेत यायची. ती परदेशी समाजााची असल्याने मराठी समजत नव्हती. एक दिवस कंबरेत वाकलेली ऐंशीत टेकलेली तिची आजी सोडवायला आली. शिक्षकांनी तिला विचारले आई का येत नाही परंतु ती नुसती हसली. मुलांकडून माहिती मिळाली आई वेडी असून मामाकडे राहते. ती वर्गात वेगळी बसायची. एक दिवस वर्ग शिक्षक अनिल पाटील यांनी तिची बॅग तपासली असता त्यात चुरगाळलेले कागद, एक शिळ्या पोळीचा तुकडा जो मधल्या सुटीतील तिचा टिफिन होता. ती रोज दुपारी आश्रमशाळेवरून जेवण आणून घरच्यांचा उदरनिवार्ह करते.

अन राधा हसली...
राधालाएकचा अंक निट काढता येत नव्हता. अखेर तिने एकचा अंक काढला. सर्व मुलांनी टाळ्या वाजविल्या. आता कुठे ती आजीचे दु:ख विसरून खळखळून हसली. तिला सभुच्या पिंप्रीराजा येथील लता काकरवाळ, पद्मसिंह राजपूत ताराचंद राजपूत, विठ्ठलसिंह सुलाने, प्रतापसिंह जारवाल, स्वरूपचंद बारवाल, इंदलसिंह राजपूत, सुनील राजपूत, महाजन चुंगडे, गोपालसिंह गौर आदींनी प्रयत्न केले. राधाची आई पाच दिवस डॉ. जीवन राजपूत यांच्या निगरानीत डॉ. वाय एस. खेडकर उपचारासाठी दाखल होती.

अन मदतीचे हात सरसावले...
शिक्षक अनिल पाटील यांच्यासह ज्येष्ठ विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, केंद्रप्रमुख नाना खांडेभराड, मुख्याध्यापक शांतीलाल राठोड, रोज जेवण देणारी आश्रमशाळा आदींनी मदत केली. शिक्षकांनी राधाची व्यथा सोशल साइटवर मांडली. तेव्हा नागझरी मुक्ताई विद्यालयाच्या रणजीत सोनवणे गणेश पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला.
बातम्या आणखी आहेत...