औरंगाबाद- मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेणे ही आतापर्यंत शिवसेनेची मक्तेदारी होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभा याच मैदानावर झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने या मैदानावर सभा घेण्याचे आजवर टाळले होते. मात्र, बुधवारची (5 मार्च) राहुल गांधी यांची सभा याच मैदानावर घेण्याचे नक्की झाले असून शिवसेनेपेक्षा जास्त गर्दी जमवून या मैदानावरील गर्दींचा उच्चांक मोडीत काढण्याचे काँग्रेसने ठरवले आहे.
राहुल यांची सभा दुपारी एक वाजता होत असून त्यासाठी मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतून दीड लाखांवर गर्दी कशी जमेल याचे नियोजन सुरू आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या दोन हजारांवर बसेस आरक्षित करण्यात आल्या असल्याचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी स्पष्ट केले. एका बसमध्ये 50 कार्यकर्ते बसले तरी दोन हजार बसमधून एक लाख व इतर खासगी वाहनातून व स्थानिक असे 50 हजार कार्यकर्ते सभेसाठी हजर राहतील, असा विश्वास पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
राहुल यांची औरंगाबादेतील सभा निश्चित झाल्यानंतर ती होणार कोठे यावर तीन दिवस काथ्याकूट सुरूहोता. केंद्राच्या विशेष संरक्षण पथकाने (एसपीजी) दोन्हीही मैदानांची पाहणी केली. शेवटी आमखास मैदानावर सभा घेण्याचे निश्चित झाले. सभा ठरल्याच्या पहिल्याच दिवसापासून सभेला विक्रमी गर्दी करण्याचा मानस पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला होता. शनिवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सिल्लोड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून सभेच्या गर्दीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे सांगितले.
गर्दी जमवण्यासाठी पक्षाकडून दोन हजार बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी खासगी वाहने अधिक असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाहनांची व्यवस्था आमखास मैदान तसेच शहराच्या बाह्य भागात केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सभांचा इतिहास
काँग्रेसकडून आतापर्यंत इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या येथे सभा झाल्या. या सर्व सभा आमखास मैदानावर झाल्या. काँग्रेस आमखासवर अन् शिवसेना-भाजप युती सांस्कृतिक मंडळावर असे समीकरण होते. या वेळी काँग्रेसने ते मोडीत काढले.