आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi News In Marathi, Aurangabad Congress

औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी ‘नॉट रिचेबल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्यामुळे शनिवारी औरंगाबादच्या गांधी भवनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली. राहुल गांधींनी देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची भेट घेतली; पण औरंगाबादकरांचा क्रमांक काही लागला नाही. येथील लोकसभेचा उमेदवार जसा वेटिंगमध्ये आहे, तसाच काहीसा प्रकार कार्यकर्त्यांसोबत झाला. हिरमुसलेल्या कार्यकर्त्यांचे शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम यांनी सांत्वन केले.

देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी राहुल संवाद साधणार असल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले होते. राहुल यांच्याशीच बोलणे होणार असल्याने कार्यकर्ते शनिवारी सकाळपासूनच गांधी भवनात गोळा झाले. अक्रम यांनी 10 वाजेपासूनच टीव्ही सुरू ठेवला होता. 11.15 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू झाली. पंजाब, तामिळनाडू, पुणे येथील कार्यकर्त्यांनी राहुल यांच्याशी संपर्क साधला. आता आपलाच क्रमांक लागेल, अशी प्रत्येकाची भाबडी अपेक्षा होती. मध्येच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने हा लाइव्ह कार्यकम पाहता आला नाही. वीज गेल्यामुळेच आपली संधी गेली, असा युक्तिवाद येथे उपस्थित असलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

राहुलला झापण्याचा आनंद
पंजाबमधील एका कार्यकर्त्याने राहुल यांना थेट जाब विचारला. चुकीच्या व्यक्तींना तिकिटे दिली जातात, हे कळूनही तुम्ही काहीच करत नाहीत... याचा उपस्थितांना चांगलाच आनंद झाल्याचे दिसले. असेच विचारायला हवे, असे प्रत्येक जण म्हणत होता. वरून उमेदवार ठरला की असेच होते म्हणून मी तुमच्या मतदानाद्वारे उमेदवार ठरवायचे म्हणतो, असे राहुलचे उत्तर राजकीय असल्याची प्रतिक्रियाही कानी आली. या कॉन्फरन्सिंगला महिला तसेच पुरुष मेकअप करून आले होते. मात्र, त्यांचा हिरमोड झाला.