आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - भाजपचे नेते हिंसाचारी आहेत, त्यांच्याच संस्कृतीच्या लोकांनी देश पारतंत्र्यात असताना इंग्रजांना मदत केली. त्याउलट काँग्रेसने मात्र स्वातंत्र्याची लढाई लढून इंग्रजांना देशातून प्रेमाने घालवले. काँग्रेस कधीही क्रोध, हिंसेचे सर्मथन करत नाही. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणार्या हिंसाचार्यांना क्रोधाने नव्हे, तर प्रेमाने घालवू, असा घणाघात काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी केला.
राज्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ बुधवारी (5 मार्च) त्यांनी औरंगाबादेतून फोडला. महाराष्ट्रात नगरसह मराठवाडा व विदर्भात नुकत्याच झालेल्या गारपिटीने शेतकर्यांचे कंबरडे मोडले. मात्र, गारपीटग्रस्तांना द्यावयाच्या मदतीबाबत राहुल यांनी ब्र उच्चारला नाही. त्यामुळे शेतकर्यांचा भ्रमनिरास झाला. नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र, आर्थिक मदतीला आचारसंहितेचा अडसर राहणार नाही असे सांगत शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राहुल गांधी यांचे दुपारी 2.11 वाजता आगमन झाले. एरवी विरोधकांचा नामोल्लेख टाळणार्या राहुल यांनी या सभेत मात्र थेट हल्ला केला. ते म्हणाले, ‘याच विरोधकांच्या पूर्वजांनी इंग्रजांना साथ दिली, आम्ही मात्र अहिंसेचा मार्ग पत्करत सत्याग्रहाच्या माध्यमातून इंग्रजांना घालवले. अगदी तसेच हिंसेचे सर्मथन करणार्यांच्या हाती देशाची सत्ता आम्ही जाऊच देणार नाही. केंद्र सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील कामांचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडून अनेक भावनिक मुद्दय़ांनाही त्यांनी स्पर्श केला. काँग्रेस केवळ पक्ष नसून एक विचारधारा आहे. हा विचार देशातील सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. सर्वच धर्मांनी लोकांना प्रेमाने वागण्याची शिकवण दिली आहे. तीन हजार वर्षांपूर्वी बुद्धांनी शांतीचा संदेश दिला, गुरुनानक आणि कुराण-ए-पाकमध्येही हिंसेचे सर्मथन करण्यात आलेले नाही. त्याशिवाय ज्या भगवद्गीतेचा विरोधक उदो-उदो करतात, त्यांनी कधी गीता वाचली का.? असा सवालही राहुल यांनी केला. या सर्वांचे विचार काँग्रेसने आत्मसात केले असून त्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अहंकार आला नाही. आम्ही लोकांना सांगण्यासाठी नव्हे, तर सर्वसामान्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी येतो, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी येतो, असेही त्यांनी म्हटले.
महाराष्ट्र देशात अव्वल : काँग्रेस सरकारने मागील दहा वर्षांत 14 कोटी लोकांना दारिद्रय़ रेषेच्या वर आणले आहे. त्यांना आता लवकरच आम्ही मध्यमवर्गीयांच्या रांगेत बसवू. महाराष्ट्र देशात अव्वल राज्य असून देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचा 17 टक्के वाटा आहे. त्याशिवाय सर्वाधिक विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. उद्योग वाढले, डीएमआयसीच्या माध्यमातून 13 लाख युवकांना आता नव्याने रोजगार उपलब्ध होतील. महिला घर आणि पक्ष चालवतात, त्यांनाच यापुढील काळात देशही चालवायचा आहे. काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना पन्नास टक्के वाटा दिला. आता विधानसभा आणि लोकसभेत महिलांचे राज्य निर्माण करण्याचा आपला संकल्प असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले.
संसदेचा दरवाजा न बघितलेल्यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्न बघावे का? : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘ज्यांनी कधीही संसदेचे दरवाजे बघितले नाहीत, ते देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत.’ संविधानाने चालणार्या या देशाचे आणि जनतेचेही भवितव्य आता जनतेच्याच हाती असल्याचे प्रकाश म्हणाले. सभेचे प्रास्ताविक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केले, तर सूत्रसंचालन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले.
भाजपला घेरले, अशोकरावांना तारले
राहुल यांनी भाषणात भ्रष्टाचारावरून भाजपला घेरले. मात्र, आदर्श प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेल्या अशोक चव्हाण यांना व्यासपीठावर स्थान देत त्यांच्या हस्ते स्वागतही स्वीकारले. दरम्यान, भाजप नेते गोपीनाथ मुंडे मुंबईत म्हणाले, राहुल यांची भ्रष्टाचारविरोधी भूमिका हा राजकीय फार्स असल्याचेच सिद्ध होत आहे.
औरंगाबाद, प्रचाराचा नारळ व योगायोग..
2004 च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल काँग्रेसने औरंगाबादेतून फुंकला तेव्हा एनडीए सरकारला हद्दपार करण्यात त्यांना यश आले. त्यानंतर 2009 मध्येही येथेच पहिली सभा झाल्यामुळे सत्ता राखण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. आता योगायोगाने 2014 च्या निवडणूक प्रचारातील नारळही येथेच फुटल्यामुळे काँग्रेस पक्षाकडे सत्ता राहणार असल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.