औरंगाबाद-काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेसाठी बाहेरगावाहून मोठय़ा संख्येने वाहने शहरात येणार असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले असून येणारी वाहने बाहेरच राहावी याची दक्षता वाहतूक शाखेने घेतली आहे. एक हजार पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात सभा होणार आहे. सभेला येताना पिशवी, सुटकेस, पर्स इत्यादी सामान आणू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, भोकरदनकडून येणार्या वाहनांसाठी आमखास मैदान निवडण्यात आले आहे. याच मार्गे येणारी लहान वाहने हसरूल टी पॉइंटमार्गे येऊन मलिक अंबर चौकात कार्यकर्त्यांना उतरवून विद्यापीठ गेटमार्गे मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानात जातील. कन्नड, खुलताबाद, चाळीसगाव, वैजापूर, गंगापूर या ठिकाणावरून येणार्या बसेस नगर नाक्यावरून छावणीमार्गे, मिलिंद चौक येथे कार्यकर्त्यांना सोडतील. तेथून आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या मैदानात या वाहनांची पार्किंग केली जाणार आहे.तसेच जीप व इतर लहान वाहनांची मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था आहे. पैठणकडून येणार्या बसेस बाबा पेट्रोल पंप, मिल कॉर्नरमार्गे ज्युबली पार्क येथे येतील. तेथे कार्यकर्त्यांना उतरवून या बस आमखास मैदानाकडे जातील. लहान वाहने व जीप या मिल कॉर्नर येथे कार्यकर्त्यांना उतरवून बारापुल्ला दरवाजामार्गे मिलिंद महाविद्यालयाच्या मैदानाकडे जातील. तसेच पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्या वाहनांसाठी जि.प. मैदानावर व्यवस्था करण्यात आली आहे. सभेला मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांतून कार्यकर्ते येणार आहेत; परंतु नेमकी किती वाहने येतील याचा अंदाज पोलिसांनाही नाही. दोन हजार बसेस आरक्षित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यापैकी एक हजार बसेस येणार हे नक्की आहे. मात्र, ऐनवेळी खासगी बसेस किती , कार्यकर्त्यांच्या स्वत:च्या मोटारी किती, याचा अंदाज नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे रस्ते निर्मनुष्य राहतील :
सकाळी दहा ते दुपारी चार दरम्यान खडकेश्वरजवळील मनपा वाचनालय ते भडकल गेट, आयटीआय महाविद्यालय, भडकल गेट ते जुने पोस्ट ऑफिसच्या पश्चिम बाजूकडील टी पॉईंट दरम्यानचा रस्ता तसेच नारळीबाग ते जिल्हा परिषद क्वॉर्टर्सचा रस्ता बंद राहणार आहे. दुपारी चार वाजेपूर्वीपर्यंत वाहनधारकांनी खडकेश्वर-मिलकॉर्नर-भडकल गेट किंवा मलिक अंबर उड्डाणपुलाखालून मनपा कार्यालयासमोरुन जाणार्या रस्त्याचा वापर करण्याची सूचना आहे.