आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राका लाइफस्टाइल'चे 'हुक्कापाणी' केले बंद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून पोलिसांनी ज्योतीनगरातील राका लाइफस्टाइल क्लबमधील हुक्का पार्लरवर धाड टाकल्यानंतर तेथे सुरू असलेले एक-एक गैरप्रकार उघडकीस येऊ लागले. शनिवारी आयुक्त प्रकाश महाजन, महापौर त्र्यंबक तुपे आणि उपमहापौर प्रमोद राठोड यांनी पाहणी केली. या ठिकाणी ब्यूटी पार्लरच्या नावाखाली मसाज पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्त महाजन यांनी क्लबच्या कागदपत्रांची छाननी होईपर्यंत हा क्लब सील करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तासाभरातच या क्लबचे हुक्कापाणी बंद करण्यात आले.
बुधवारी रात्री पोलिसांनी या स्पोर्ट््स क्लबवर धाड टाकून खुलेआम सुरू असलेले हुक्का पार्लर उघडकीस आणले होते. गुरुवारी दुपारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हा क्लब मनपाच्या मालकीच्या जागेवर असल्याचे सांगितल्यानंतर सायंकाळी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, अतिक्रमण विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी या क्लबची पाहणी केली होती. त्या वेळी तेथे अनेक नियमबाह्य गोष्टींचे दर्शन झाले. उद्यानाच्या जागेचा वापर पार्किंगसाठी केला जात असल्याचे, साइड मार्जिनच्या जागेत पूलटेबल सुरू केल्याचेे दिसले.
मनपाने रेस्टारंट तसेच पूल टेबल बंद केले. मात्र, उर्वरित अतिक्रमण काढता क्लबचालकावर कोणतीच कारवाई केली नाही. शनिवारी सायंकाळी महापौर तुपे यांच्या दालनात उपमहापौर राठोड आले. त्यांनी क्लबवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सिकंदर अली यांना कॉल केला. अलींनी क्लबवर कारवाई चालू आहे, मात्र, आपल्याला यासाठी लीगल अॅडव्हायझरची गरज असल्याचे सांगितले. क्लबमध्ये अनिधकृतपणे पूल टेबल सुरू असताना अलींना कायदेविषयक सल्ल्याची काय गरज, असा प्रश्न तुपे आणि राठोड यांना पडला. त्यांनी आयुक्त महाजन यांना फोन करून क्लबवर येण्याची विनंती केली.
तिघांनी केली झाडाझडती : महापौर,उपमहापौर आणि आयुक्तांनी या क्लबची बारकाईने पाहणी केली असता त्या ठिकाणी डान्स क्लाससह ब्यूटी पार्लर आणि त्याअंतर्गत अनेक गैरप्रकार सुरू असल्याचा संशय आला. ब्यूटी पार्लरमधील बेड पाहिल्यानंतर तिघांनाही वेगळी शंका आली. क्लबच्या सर्व झाडाझडतीनंतर महाजन यांनी तासात पंचनामा करून क्लब सील करण्याचे आदेश दिले.

अली, राकाची कानउघाडणी : राका लाइफस्टाइल क्लबमधील गैरप्रकार समोर आल्यानंतर मनपाचे नाव का बदनाम करता, हे धंदे अधिकाऱ्यांना दिसले नाहीत का, मनपाने तपासणी केली नाही का? अशा शब्दांत तुपे आणि राठोड यांनी सिकंदर अली क्लबचा संचालक सुनील राका यांची कानउघाडणी केली. राकांंनी चूक कबूल केली.
महिलांचे निवेदन : क्लबच्या शेजारी राहणाऱ्या गृहिणींनी आयुक्त प्रकाश महाजन यांच्याकडे क्लबमध्ये येणाऱ्या मुला-मुलींचे चाळे आणि त्यापासून होणाऱ्या त्रासाचे गाऱ्हाणे मांडले.

बंद खोलीत तरुण-तरुणी
महिलांसाठी असलेल्या ब्यूटी पार्लरमध्ये दोन तरुण आणि दोन तरुणी आढळून आल्या. याबाबत महापौर तुपे यांनी राका यांच्याकडे विचारणा केली असता हे तरुणच या पार्लरमध्ये काम करतात, असे स्पष्टीकरण राका यांनी दिले. तिन्ही केबिनमध्ये बेड, सीसीटीव्ही आढळून आले. सीसीटीव्हीचे डीव्हीआर ताब्यात घेतले.
अतिक्रमण जैसे थे
मनपाने कारवाई करून सगळे शेड काढून ओपन टू स्काय केले, असे अली यांनी महापौरांना सांगितले. प्रत्यक्ष पाहणीत मात्र रेस्टॉरंटचे अतिक्रमण, अँगलचे शेड कायम दिसून आले. इतके दिवस हे मनपाच्या का लक्षात आले नाही, असे विचारले असता अलींची बोबडी वळली. कर्मचारी नसल्याने कारवाई केली नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.
गुन्हा नोंदवू
- नियमानुसार कारवाई करून कागदपत्रे करार पाहून चुकीचे काही असल्यास गुन्हा नोंदवू. एका तासात क्लब सील करण्याचे आदेश दिले.
प्रकाश महाजन, मनपा आयुक्त