आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भिकार्‍याला रुळावर झोपवून रेल्वे दरवाढीचा अनोखा निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्यामुळे आंदोलन करण्याची सवय मोडलेल्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोदी सरकारने केलेल्या रेल्वे दरवाढीच्या निषेधार्थ रेल रोको करणे बरेच अवघड गेले. त्यामुळेच रेल्वेस्थानकावरील घाणेरड्या पटरीवर स्वत: झोपण्याऐवजी त्यांनी एका भिकार्‍याला झोपवून बुधवारी केंद्र सरकारविरुद्ध निषेध नोंदवला. घोषणा देऊन थकल्यामुळे अवघ्या दहा मिनिटांतच घामाघूम झालेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन गुंडाळून सावलीत बसणे पसंत केले.

केंद्राने नुकतीच 14 टक्के रेल्वेच्या प्रवासी व मालवाहतूक दरात साडेसहा टक्के भाडेवाढ केली आहे. ही वाढ अन्यायकारक असून त्याविरोधात देशभरात आंदोलन केले जात आहे. शहर, जिल्हा काँग्रेस आघाडीच्या वतीनेही दुपारी 12.30 वाजता औरंगाबाद स्थानकावर रेल रोको करण्यात आला. यात जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम, किरण डोणगावकर, नगरसेवक बाळूलाल गुर्जर, जगन्नाथ काळे, प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, जगन्नाथ खोसरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शोभा खोसरे, अशोक मगर, प्रभाकर मुठ्ठे, गजानन सुरासे, विनोद तांबे, सरोज मसलगे, गुरुमित कौर, अरुणा बोडखे यांनी सहभाग घेतला.
भिकार्‍याच्या हातात काँग्रेसचा झेंडा : नगरसोल-नरसापूर रेल्वे दुपारी 12.30 वाजता एक क्रमांकाच्या स्थानकावर आली. या गाडीस औरंगाबाद स्थानकावर 20 मिनिटांचा पाणी भरण्यासाठी थांबा आहे. नेमके हेच कारण हेरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे दरवाढीविरुद्ध इंजिनवर चढून घोषणाबाजी केली. रेल्वेच्या रुळावर आॅइल व घाण पडलेली असल्याने शुभ्र कपडे घालून आलेल्या कार्यकर्त्यांना पटरीवर झोपण्याची इच्छाच झाली नाही. काहींनी स्थानकावर फिरणार्‍या भिकार्‍यास पकडून आणले. त्याच्या गळ्यात काँग्रेसचा पट्टा टाकून हातात झेंडा दिला व त्यास पटरीवर लोळवले. त्याच्या आजूबाजूला सर्व नेते जमा झाले व घोषणाबाजी सुरू केली.
शहरात सुरू असलेल्या रिक्षा आंदोलनाचा फटका आंदोलनकर्त्यांना बसला. रेल्वेस्थानकावर आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणार्‍या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या अनिता भंडारी व विजया भोसले यांना रिक्षाच मिळाली नाही. त्यामुळे सर्व आंदोलन संपल्यावर त्या स्थानकावर हजर झाल्या.
दहा मिनिटांत आंदोलन समाप्त
रेल रोको आंदोलन दहा मिनिटात संपले. रेल्वेला पाणी भरण्यासाठी वीस मिनिटांचा वेळ होता. हैदराबाद-औरंगाबाद पॅसेंजर दुपारी 12.50 वाजता स्थानकावर येत असल्याने नगरसोल-नरसापूर रेल्वेला रोखून धरण्यात आले. त्यामुळे रेल्वेच्या वेळेतच आंदोलन संपले. आंदोलनासाठी अधिक काळ रेल्वे थांबवण्याची गरज पडली नाही. प्रमुख पाच कार्यकर्त्यांवर कारवाई करून सोडून देण्यात आले.
(फोटो - रेल्वे तिकिटाच्या दरवाढीविरोधात बुधवारी काँग्रेस शहर जिल्हा आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी भिकार्‍याला रुळावर झोपवले. छाया : मनोज पराती)