आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो’ धावत्या रेल्वे अन् प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडूनही बचावला, थराराने चुकवला काळजाचा ठोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदीप घाटोळे यांनी श्रेणिकला दरवाजातून आत ढकलले. - Divya Marathi
प्रदीप घाटोळे यांनी श्रेणिकला दरवाजातून आत ढकलले.
औरंगाबाद- आई-वडिलांसह रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नांत तीनवर्षीय चिमुकला पाय बॅगमध्ये अडकून प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या मधोमध जाऊन पडला. प्रसंगावधान राखत काही प्रवाशांनी चेन ओढून रेल्वे थांबवल्यामुळे मुलगा बालंबाल बचावला. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना शनिवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास औरंगाबाद रेल्वेस्थानकावर घडली. 

मनमाड-काचीगुडा पॅसेंजर सकाळी ८.३५ च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आली. दहा मिनिटांच्या थांब्यानंतर ती सुटली. याचदरम्यान प्रदीप घाटोळे, त्यांच्या पत्नी श्रुतिका आणि तीनवर्षीय मुलगा श्रेणीक रेल्वे पकडण्यासाठी धावले. श्रुतिका प्रथम डब्यात चढल्या. नंतर प्रदीप यांनी मुलासह सामान श्रुतिका यांच्याकडे देऊन धावत्या रेल्वेत चढत असताना श्रेणीक हातातून निसटून प्लॅटफॉर्म रेल्वेच्या मध्ये पडला. यामुळे प्रवाशांनी एकच आरडाओरड केली. चिमुकल्याला वाचवण्यासाठी प्रदीप आणि प्रवाशांनी प्रयत्न केले. या धावपळीत प्रदीप आणि चौघेजण खाली पडले. दरम्यान, रेल्वेतील प्रवासी सागर त्रिभुवन आणि प्रा. प्रशांत गायकवाड यांनी चेन ओढून रेल्वे थांबवली. यामुळे चिमुकला बचावला. 

मोठा अनर्थ टळल्याने सुटकेचा नि:श्वास सोडत घाटोळे कुटुंबीय पुढच्या प्रवासासाठी त्याच रेल्वेने रवाना झाले. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. रेल्वे पीएसआय आनंद वानखेडे, जीआरपीएफचे भगवान कांबळे, रेल्वेस्थानक व्यवस्थापक एल. के. जाखडे, अमोल गंडे आणि प्रवाशांनी मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली होती. 

अवघ्या आठ इंचांचे अंतर 
प्लॅटफॉर्म आणि रेल्वेचे अंतर अवघे इंचांचे असते. एखादा मोठा प्रवासी असो की छोटा, तो पडल्यानंतर रेल्वेच्या चाकात येण्याची दाट शक्यता असते. मात्र, तीनवर्षीय श्रेणीक नशीबवान ठरला. 

धावत्या रेल्वेत चढू नका 
अशा प्रकारे धावत्या रेल्वेत प्रवाशांनी, विशेषत: महिलांनी चढून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रेल्वेस्टेशन व्यवस्थापक एल. के. जाखडे, मराठवाडा प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी यांनी केले. 
बातम्या आणखी आहेत...