आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझर्व्हेशन दलाल जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रेल्वेचे तत्काळ आरक्षण देण्यात होत असलेली दलाली थांबवण्यासाठी रेल्वे विभागाकडून प्रयत्न होत असले तरी दलालांचा सुकाळ आहे. शनिवारी रेल्वे पोलिसांनी आरक्षण कार्यालयात आरक्षण तिकिटांची दलाली करणार्‍या गणेश भगवानराव पाटील (32) यास अटक केली आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी शनिवारी (14 जुलै) रोजी तत्काळ आरक्षण कार्यालयात दलालावर नजर ठेवून होते. सकाळी 10.15 वाजता गणेश पाटील हा या कार्यालयात मनमाड ते निझामाबाद आरक्षण करण्यासाठी आला. पोलिसांनी त्यास ओळखपत्र विचारले असता त्याने वाहन चालवण्याचा परवाना दाखवून स्वत:साठी आरक्षण करत असल्याचे सांगितले. मात्र, बुकिंग क्लार्कला त्याने दुसर्‍या प्रवाशाचे ओळखपत्र दाखवून तिकीट हस्तगत केल्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
दरम्यान संबंधित प्रवाशाशी संपर्क साधला असता त्याने गणेशकडून कमिशनवर तिकीट घेत असल्याची कबुली दिली. यासाठी 12 जुलै रोजी गणेशला आगाऊ रक्कम दिली असल्याचे सांगितले. गणेश अधिकृत आरक्षण कर्मचारी किंवा रेल्वेत नोकरीस असल्याचा कोणताही पुरावा देऊ शकला नाही. यानिमित्ताने आरक्षण कार्यालयात बुकिंग क्लार्कचा अनागोंदी कारभार उघड झाला आहे. तसेच आरक्षण कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाइल ज्ॉमर आदी उपाययोजना नसल्याने दलालांसाठी रान मोकळे असल्याचे स्पष्ट झाले आहे.