आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Boggy Repairing Unit In Aurangabad, South Central Railway Director Proposal

रेल्वे डबे दुरुस्तीचे केंद्र औरंगाबादेत,दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रेल्वे बोगींच्या दुरुस्तीचा (पीटलाइन) प्रकल्प औरंगाबादेत उभारण्यासंबंधीचा प्रस्ताव गेल्याच महिन्यात रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. साठ लाख रुपये खर्चाचा हा प्रस्ताव लवकरच रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. याशिवाय मनमाड-परभणी लोहमार्ग दुहेरीकरण सर्वेक्षणाच्या कामाची निविदा फेब्रुवारीत फायनल होऊन 2015 मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. सर्व बाबींची तपासणी करून पीटलाइनचा प्रस्ताव पुढे पाठवला जाईल, असे दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पी.के. श्रीवास्तव यांनी सांगितले. लोहमार्ग दुहेरीकरणानंतर मार्गावरील 180 टक्के भार कमी होईल. शिवाय रेल्वेगाड्यांची संख्याही वाढेल. 2008-09 मध्ये तयार करण्यात आलेल्या औरंगाबाद रेल्वेच्या प्रोफाइलमध्ये दुहेरीकरणासह पीटलाइन, रेल्वेगाड्या वाढीसंबंधी नोंद आहे. मात्र स्थानिक नेत्यांचा पाठपुरावा कमी पडत होता. त्यामुळे यासबंधीचे प्रस्ताव पाठवले जात नव्हते. तथापि, मागील तीन वर्षांपासून आमदार प्रशांत बंब यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून दुहेरीकरणाची निविदा काढण्यात यश मिळवले. त्यानंतर नांदेड विभागाचे प्रबंधक पी.सी. शर्मा यांनी पीटलाइनचा प्रस्तावही तयार करून पाठवला.
डबे दुरुस्तीची जागा अशी
सध्या मनमाड किंवा पूर्णा जंक्शन येथेच बोगी दुरुस्तीचे काम होते. औरंगाबादेतील या प्रकल्पाच्या प्रस्तावानुसार एमआयडीसीतून एमआयटीकडे जाणारे रेल्वेगेट पुढे सरकण्यात येईल. स्थानकाकडे जाणा-या लाइनलगत पीटलाइनची जागा प्रस्तावित आहे. 15 मीटर रुंद आणि 750 मीटर लांब अशा जागेत उभ्या राहणा-या बोगींखाली अभियंत्यांना काम करता यावे म्हणून खोल चारी तयार केली जाईल. त्यासाठी येणा-या 60 लाखांच्या खर्चाची तरतूदही रेल्वेकडे आहे.
असे होणार दुहेरीकरण
बारा वर्षांपासून रखडलेल्या मनमाड-परभणी (291 कि.मी.) दुपदरीकरणाच्या सर्वेक्षणासाठी 43 लाख 91 हजार 190 रुपयांची निविदा 7 जानेवारी रोजी रेल्वेने काढली आहे. या प्रक्रियेसाठी परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिकच्या जिल्हाधिका-यांची मदत घेण्याचेही आदेश आहेत. एका वर्षात सर्वेक्षण करून अहवाल सादर केल्यावर प्रत्यक्ष कामाची प्रक्रिया सुरू होईल.
पीटलाइनचे हे आहेत फायदे
पीटलाइनमुळे कोचची दुरुस्ती औरंगाबादेतच होईल. त्यासाठी मनमाड किंवा पूर्ण येथे दुरुस्तीसाठी जाण्यावर होणारा डिझेल खर्च वाचेल.
औरंगाबादेतून सुटणा-या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ होईल. यात पाटणा-पूर्णा, कृष्णा एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंत येईल.
जैसलमेर, उदयपूर, जोधपूर, जयपूर, बिकानेर आणि शिर्डी या मार्गासाठी नवीन रेल्वे सुरू करण्यातील रेल्वेला येणारी अडचण दूर होईल.
दुहेरीकरणामुळे औरंगाबाद-गोरखपूर गाडी सुरू होऊ शकते. वाराणसी, पशुपतिनाथ व मानसरोवरच्या भाविकांची यामुळे सोय होईल.