आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Development Less In Marathwada : Railway Minister Bansal

मराठवाड्यात रेल्वेचा विकास कमी : रेल्वेमंत्री बन्सल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यात रेल्वे विकास इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. मराठवाड्यातील दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील भाग मध्य रेल्वेला जोडण्यासंबंधीचा निर्णय आपण घेऊ शकत नाही. यासंबंधी समिती बनवण्यात आली आहे. निर्णय घेण्याचे सर्वाधिकार समितीला असल्याचे सांगून विलीनीकरणासंबंधीच्या प्रश्नाला रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी बगल दिली.


शिर्डी दौ-यावर आलेले रेल्वेमंत्री शनिवारी औरंगाबादहून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी चिकलठाणा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, रेल्वेच्या विकासासाठी देशभर निधी कमी पडत आहे. लोहमार्ग, गाड्या, कोचेस वाढवणे व स्थानकांवर चांगल्या सुविधा देण्यासंबंधीची मागणी जोर धरत आहे. सर्व मागण्यांचे समाधान करायचे झाल्यास पाच वर्षे सातत्याने 7 टक्के सरसकट भाडेवाढ केल्यास एक लाख कोटी रुपयांचा निधी जमा होईल. यातून रेल्वेसंबंधीच्या मागण्या सोडवण्यात मदत होणार आहे. मागील वर्षी महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी रेल्वे बजेटमध्ये एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदा यात पाचशे कोटींची वाढ करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक राज्यांचा विचार करून निधी दिला जातो. रेल्वेचा प्रवास हा प्रत्येक राज्यातील बस प्रवासाच्या तुलनेत 3 ते 5 पटींनी स्वस्त आहे. शिर्डी येथे दर्शनासाठी गेलोे असता तेथे एकच रेल्वे प्लॅटफॉर्म असल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण देशभरातून शिर्डीसाठी गाड्या वाढवण्याची मागणी होत आहे. लवकरच शिर्डीतील रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये वाढ करण्याची गरज बन्सल यांनी व्यक्त केली.


दिल्ली मुंबईसाठी मागणी
औरंगाबादेतून मुंबई आणि दिल्लीसाठी गाड्यांची मागणी वाढली आहे. लोहमार्ग, स्टेशनवरील सुविधा आदींसाठी निधी कमी पडत आहे. यासाठी एक लाख कोटींची गरज आहे. प्रवास भाड्यात प्रतिवर्ष 7 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय अद्याप घेतला नसून तसा केवळ विचार सुरू आहे.


जळगाव मार्गाची माहिती घेतो
सोलापूर जळगाव नवीन मार्ग औरंगाबाद, वेरूळ व अजिंठामार्गे करण्यासंबंधीचे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. मध्यंतरी हा मार्ग बदणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या नकाशावर दाखवण्यात आले होते. यासंबंधी आपण माहिती घेऊ, असे ते म्हणाले.