आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवगिरी, नंदीग्रामचा विस्तार; पंचवटी, राजाराणी मनमाडपर्यंतच; रेल्वेचा विस्तार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- रेल्वेला कुठल्याही एका स्थानकापर्यंत मर्यादित ठेवता येत नाही, हे सूत्र आैरंगाबादकर जनतेच्या चांगले पचनी पडले आहे. आैरंगाबादकरांच्या चार रेल्वे आतापर्यंत इतरांनी पळवल्या, मात्र इतर रेल्वेंचा मात्र विस्तार केला जात नाही. मनमाड येथून दोन गाड्यांचा विस्तार आैरंगाबादपर्यंत करावा, अशी मागणी झाल्यानंतर मनमाडमध्ये झालेल्या आंदोलनाने उपरोक्त गाडीचा विस्तार रखडला. आैरंगाबादसाठीच्या रेल्वेंचा विस्तार होत असताना इतर ठिकाणांहून मात्र गाड्या आपल्यापर्यंत आणण्यात यश येत नाही.

 

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व आंदोलन करण्याची धमक नसल्याने इतर रेल्वेंचा आैरंगाबाद अथवा मराठवाड्यापर्यंत विस्तार होत नसल्याचे दिसते. मराठवाड्याची राजधानी मानली जात असलेल्या आैरंगाबादला आैद्योगिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्व आहे. अलीकडे कासवगतीने का होईना आैरंगाबादमध्ये विकासाची प्रक्रिया सुरू झाली. मोठ्या आंदोलनानंतर आैरंगाबादला ब्रॉडगेज मिळाले. त्यानंतर आता आैरंगाबादसह संपूर्ण मराठी भाषिक प्रदेश जो दक्षिण मध्य रेल्वेला जोडलेला आहे तो आता मध्य रेल्वे मुंबईला जोडण्याची मागणी करत आहे. आैरंगाबादसह नांदेडला मॉडेल स्थानक मंजूर झाले, परंतु दुसऱ्या टप्प्याच्या कामास मागील पाच वर्षांपासून सुरुवातच झाली नाही. आैरंगाबादचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व लक्षात घेऊन येथे दुहेरीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु पहिला टप्पा मुदखेड-परभणीचा अजून पूर्ण व्हायचा आहे. 


लातूरकरांची अाडकाठी : मुंबई - लातूर एक्स्प्रेसचा मार्ग आैरंगाबादऐवजी पुणे - कुर्डूवाडी करण्यात आला. या रेल्वेचा विस्तार प्रारंभी परळीपर्यंत करण्याचे ठरले. नंतर गाडी नांदेडपर्यंत नेण्यात येईल म्हणून घोषणा करण्यात आली. यानंतर लातूरकरांनी आंदोलन केले. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही यासंबंधी विचारण्यात आले तेव्हा २०११ मध्ये त्यांनी सांगितले होते की, रेल्वेगाड्यांना प्रादेशिक बंधनात बांधणे शक्य नाही. नांदेडपर्यंत धावणाऱ्या रेल्वेंचा विस्तार पुढे सिकंदराबाद व नागपूरपर्यंत झाला. त्यामुळे लातूरच्या गाड्या नांदेडपर्यंत आल्या तर वावगे काय? यानंतर लातूरकरांनी एक दिवस लातूर बंद ठेवले होते. त्यानंतर मुंबई - लातूर (२२१०७) या रेल्वेचा विस्तार रद्द करावा लागला. 


मनमाडकरांनी रोखली पंचवटी : मुंबई - मनमाड (१२१०९) पंचवटी एक्स्प्रेसचा विस्तार आैरंगाबादपर्यंत करण्याची तयारी सुरू असल्याची चाहूल मनमाडकरांना लागली. उपरोक्त रेल्वे डबल डेकर असून सर्व आसने सीटिंग आहेत. मनमाडकरांनी मोठे आंदोलन करून पंचवटीचा आैरंगाबादपर्यंतचा विस्तार रोखला. आता राजाराणी एक्स्प्रेस (२२१०१) या रेल्वेचा विस्तार आैरंगाबादपर्यंत करण्याचे सूतोवाच नुकतेच आैरंगाबादच्या दौऱ्यावर आलेल्या दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी केला आहे. यामुळे आता एक रेल्वे आैरंगाबादकरांच्या सेवेत येण्याची शक्यता बळावली आहे. 


तिकीट विक्रीतून प्रतिदिन १३ लाख : आैरंगाबाद स्थानकावरील चालू तिकीट खिडकीतून साडेसहा लाख रुपये प्रतिदिन मिळतात, तर उपरोक्त तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांची संख्या १३ हजार प्रतिदिन इतकी आहे, तर दीड हजार प्रवाशांकडून सुमारे सात लाखांची आरक्षित तिकिटे खरेदी केली जातात. मुंबईला अंदाजित नियमित व आठवडी सात रेल्वेंच्या माध्यमातून सुमारे आठ ते दहा हजार प्रवासी आैरंगाबाद व मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधून प्रवास करतात.

 

रेल्वेची पळवापळवी 
- मनमाड ते नांदेड रेल्वेमार्गाची क्षमता प्रतिदिन २० रेल्वेगाड्या धावण्याची असताना उपरोक्त मार्गावर ७० रेल्वे धावतात. 
- आैरंगाबाद व मराठवाड्यासाठी सुरू करण्यात आलेल्या देवगिरी एक्स्प्रेसचा विस्तार सिकंदराबादपर्यंत करण्यात आला. यामुळे या रेल्वेत आैरंगाबादकरांना जागाच मिळत नाही. 
- नंदीग्रामचा विस्तार नागपूरपर्यंत केल्याने येथेही जालना, आैरंगाबादकरांची परवड होते. 
- जनशताब्दी एक्स्प्रेस जालन्यापर्यंत वाढवण्यात आली. आता या रेल्वेचा विस्तार परभणीपर्यंत करण्याची मागणी हाेत आहे. 
- लातूर - मुंबई पूर्वी आैरंगाबाद मार्गे जायची, परंतु ती गाडी आता पुणे - कुर्डूवाडी मार्गे धावायला लागल्याने ही एक रेल्वे आैरंगाबादकरांच्या खात्यातून बाद झाली. नुकतीच मुंबईसाठी सुरू करण्यात आलेल्या साप्ताहिक अंजनी कुर्ला, निझामाबाद कुर्ला यांचाही फायदा आैरंगाबादकरांना मिळत नाही. 

 

 

मुंबईसाठी गाडी आवश्यक 
आैरंगाबादहून मुंबईसाठी रात्रीची रेल्वे सोडण्याची मागणी अनेक दिवसांपासून आहे. आैरंगाबादहून मुंबईसाठी जायला एकाही रेल्वेचे आरक्षण मिळत नाही. देवगिरी, नंदीग्राम आणि तपोवन नांदेडहून फुल्ल होतात. जनशताब्दीही आता जालन्यापर्यंत गेल्याने आैरंगाबादकरांना रात्रीची एक नियमित गाडी हवी आहे. 
- आेमप्रकाश वर्मा, संस्थापक, मराठवाडा रेल्वे विकास समिती . 

 

मुंबईत जागा नाही 
देशभरातून मुंबईसाठी रेल्वेंची मागणी होत असल्याने मुंबईत रेल्वे उभी करण्यासाठीही जागा शिल्लक नाही. आैरंगाबादहून मुंबईसाठीच्या रेल्वेची अनेक दिवसांपासून मागणी आहे. जनशताब्दीला जागेच्या कारणावरून दादरपर्यंतच चालवले जाते. मनमाडपर्यंत धावणाऱ्या राजाराणी एक्स्प्रेसला आैरंगाबादपर्यंत आणणे शक्य आहे. यासंबंधी दोन्ही विभाग एकमेकांच्या संपर्कात आहेत. 
- विनोदकुमार यादव, मुख्य व्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे 

 

बातम्या आणखी आहेत...