आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचे शिर्डीला जाण्यासाठी शुक्रवार, 29 मार्च रोजी चिकलठाणा विमानतळावर आगमन झाले. खासगी दौर्यावर कुटुंबासह आलेल्या बन्सल यांचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावर स्वागत केले. कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारून बन्सल शिर्डीकडे रवाना झाले.
बन्सल दुपारी 4.30 वाजता दिल्लीहून विमानाने विमानतळावर दाखल झाले. विमानतळावरून सरळ राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. तेथून बन्सल सरळ शिर्डीकडे रवाना झाले. बन्सल 29 मार्चला शिर्डी येथे मुक्काम करणार असून 30 मार्चला शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन दुपारी 2.30 वाजता सुभेदारी विर्शामगृहावर हजर होतील.
काँग्रेसचे फुलंब्रीचे आमदार डॉ. कल्याण काळे यांनी रेल्वेमंत्री बन्सल यांना विमानतळावर निवेदन दिले. सोलापूर औरंगाबाद जळगाव रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे आदेश रेल्वे विभागाकडून देण्यात आले असून उपरोक्त मार्ग बदलण्यात येऊ नये. याला औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा याप्रमाणेच परवानगी देण्यात यावी. औरंगाबाद येथे विकसित होत असलेल्या दिल्ली मुबई इंडस्ट्रीज कॉरिडॉरसाठी रेल्वे विभागाने विशेष साइड लाइन टाकून द्यावी. मनमाड औरंगाबाद दुहेरी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहे. उपरोक्त सर्वेक्षण लवकर पूर्ण करून दुहेरी लाइन टाकण्यास प्राथमिकता देण्यात यावी.
औरंगाबाद शहराचे पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेता रेल्वेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी आमदार एम. एम. शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम, चंद्रभान पारखे , नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. सोईन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिर्डीला जाण्यासाठी बन्सल यांचा गाड्यांचा ताफा सायंकाळी 5 वाजता विमानतळावरून रवाना झाला. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या सोलापूर विभागाची त्यांना शिर्डी येथे नेण्याची व परत औरंगाबादला सोडण्याची जबाबदारी आहे. औरंगाबाद येथील आरपीएफ विभागाने विमानतळावर बन्सल यांना सुरक्षा व्यवस्था बहाल केली होती. दोन दिवसांपासूनच सुरक्षा विभागाची तयारी सुरू होती. औरंगाबाद स्थानकावरही रेल्वेमंत्र्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ रंगरंगोटी सुरू होती.
रेल्वेमंत्र्यांचा स्टेशनला भेट देण्याचा नियोजित कार्यक्रम नसला तरीही चोख व्यवस्था व स्वच्छता ठेवण्यात आली होती. रेल्वे स्थानकाबाहेर आरक्षण कार्यालयाजवळ लावली जाणारी दुचाकी वाहनांची पार्किंगही सकाळी हलवण्यात आली होती. सकाळी त्यांनी रेल्वेस्थानकाची पाहणी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.