आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे भरती घोटाळा: मुंबईची नीलूसिंग टोळीची सूत्रधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बेरोजगारांना लाखो रुपयांना लुटण्यासाठी फरार असलेल्या चंद्रशेखरसिंगची पत्नी नीलूसिंग ही एजंटसह संपूर्ण टोळी घरबसल्या ऑपरेट करायची. तिला राजस्थानातील कोटा पोलिसांनी मुंबईमधील नालासोपारा येथून अटक केली आहे, तर अटकेत असलेल्या नितीन वाडकर आणि महेंद्रसिंग ऊर्फ एम.पी. सिंगला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सध्या अटकेत असलेल्या महेंद्रसिंगने पोलिसांना सांगितले की, फरार राजेशसिंग, चंद्रशेखरसिंग आणि स्वत: मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. वाडकर आणि चंद्रशेखरसिंग हे एकाच परिसरात राहतात. चंद्रशेखरसिंगची आणि भूषण देशमुखची शिर्डी येथे ओळख झाली होती. या वेळी चंद्रशेखरसिंगने भूषणला आपल्या जाळ्यात ओढत त्याला रेल्वेत नोकरी लावून देण्यासाठी बेरोजगारांचा शोध घेत संपर्क साधण्याचे सांगितले होते. चंद्रशेखरसिंगची पत्नी नीलूसिंग ही नेहमी मुख्य सूत्रधार हरिनारायण गुप्ता व त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या संपर्कात असायची. बेरोजगारांना आमिष दाखवत त्यांच्याकडून आलेला पैसा गुप्ताकडे गोळा करायचे.

महेंद्रसिंगने गुप्ताजवळ आतापर्यंत दोन कोटी आठ लाख रुपये जमा केल्याचे सांगितले आहे, तर भूषण देशमुखने त्याच्या आईच्या बँक खात्यावर पाच लाख रुपये व मावशीकडे 20 लाख रुपये जमा केलेले आहेत. तसेच त्याच्या स्वत:च्या खात्यावर दोन लाख रुपये असल्याची माहिती रामपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक हरिचरण मीना यांनी गुरुवारी दिली. यातील बर्‍याचशा बेरोजगारांनी जमिनी विकून पैसे दिल्याचेही मीना म्हणाले. नीलूसिंगला फ्लॅट क्र. 201, रश्मी अपार्टमेंट, नालासोपारा येथून गुरुवारी अटक करण्यात आली.

जाधवने बांधले 88 लाखांत नवे घर
पुतण्या अक्षय जाधवला भूषण देशमुखसह दहा जणांविरुद्ध तक्रार देण्याचे सांगत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न उपनिरीक्षक दिलीप जाधवने केल्याचे मीना यांनी सांगितले. रामपुरा पोलिस ठाण्यात जाधवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुखचा एजंट म्हणून काम करत जाधवने प्रत्येकाकडून 12 लाख रुपये घेतले आहेत. मुळात देशमुखपर्यंत मात्र 1 कोटी 42 लाख रुपये पोहोचले आहेत. उर्वरित 88 लाख रुपये जाधवने हडप करत सिडकोतील एन-2, ठाकरेनगरमधील सी-सेक्टरमध्ये असलेल्या प्लॉट क्र. 131 वर नव्याने दुमजली बंगला बांधल्याचे मीना यांनी सांगितले.