आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे आरक्षित डब्यांतील गर्दी रोखणे प्रशासनासमाेर अाव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हुजूर साहिब नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमधील आरक्षित डब्यांमधील गर्दी रोखण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश येत आहे. नांदेड येथून निघालेली रेल्वे औरंगाबाद, मनमाडपर्यंत गर्दीने खचाखच भरलेली असते. त्यातच औरंगाबाद येथे पाच मिनिटांचा थांबा असलेल्या तपोवन एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यांमधील गर्दीमुळे प्रवाशांना स्थानकावर उतरणे देखील दुरापास्त होत आहे. यात मुख्य करुन महिला प्रवाशांची होणारी परवड होत आहे. ती थांबवण्यात यावी अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात आली आहे.
मराठवाड्यातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशाची गर्दी वाढत आहे. असे असले तरी रेल्वे प्रशासन मात्र मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. औरंगाबादहून मनमाडमार्गे मुंबईला सहा रेल्वेगाड्या धावतात. तर यातील चार गाड्या नियमित धावतात.

औरंगाबाद-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादहून सकाळी ६ वाजता निघते. रेल्वेला मनमाडपर्यंत कुठेच थांबा नाही. औरंगाबाद येथून निघाल्यानंतर जनशताब्दी सरळ मनमाडपर्यंत कुठेच थांबत नाही. त्यानंतर मुंबईसाठी दुपारी २.३० वाजता नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस आहे. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस रात्री ९.३० वाजता व सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस रात्री ११.२० वाजता औरंगाबादहून सुटते. अजनी-कुर्ला साप्ताहिक एक्स्प्रेस शनिवारी तर निजामाबाद-कुर्ला साप्ताहिक रेल्वे सोमवारी असते. दोन्ही साप्ताहिक रेल्वे सकाळी ६.२५ वाजता निघतात.
तपोवन एक्स्प्रेस नांदेड येथून सकाळी १०.१० वाजता निघते. तत्पूर्वी धर्माबाद-मनमाड पॅसेंजर नांदेडहून सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास निघते. नांदेडहून सचखंड एक्स्प्रेस व तपोवन एक्स्प्रेस एकापाठोपाठ काही कालावधीने निघत असल्याने सर्वाधिक ताण तपोवन एक्स्प्रेसवर पडत आहे. सचखंड एक्स्प्रेस सुपरफास्ट असल्याने त्यात आरक्षित वर्गात प्रवाशांना घुसता येत नाही. उपरोक्त गाडीस तिकीट तपासनीस व काही सुरक्षा यंत्रणा तैनात असते. "तपोवन'च्या आरक्षित डब्यात मात्र अनारक्षित प्रवाशांना सहज प्रवेश मिळतो. "तपोवन'मध्ये सुरक्षा यंत्रणा कमकुवत असून तिकीट तपासनीसही येत नसल्याने अनारक्षित प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर फावत आहे. औरंगाबादला येईपर्यंत "तपोवन'मध्ये पाय ठेवायला जागा नसते. परिणामी आरक्षित प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर अडचण होत आहे. आरक्षित डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत आहे. अक्षरश: गाडीत सामान ठेवण्याच्या जागेवर प्रवासी बसून प्रवास करताना आढळून येतात. औरंगाबादहून पुढे मनमाडपर्यंत गर्दी अशीच कायम असते.
डेमूच्या फेऱ्या वाढवा मागणी
सचखंड व तपोवनवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी जालना-नगरसोल डेमू शटलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. धर्माबाद-मनमाड पॅसेंजर सकाळी १०.३० वाजता औरंगाबाद येथून गेल्यानंतर दुपारी १.३० वाजेपर्यंत मनमाडकडे जायला रेल्वेच नसते. डेमू शटल सकाळी ७.०५ वाजता औरंगाबादहून नगरसोलकडे जाते. सकाळी ९.३० वाजता रेल्वे नगरसोल येथे पोहोचते. उपरोक्त रेल्वे सायंकाळी ५ वाजेनंतर नगरसोल येथून निघते. त्यामुळे सकाळपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत डेमू नगरसोल येथे थांबलेली असते. डेमूला मनमाडपर्यंत सकाळी नेले जावे व मनमाड येथून सकाळी १० ते १०.३० दरम्यान पुन्हा औरंगाबादसाठी सोडण्यात यावे. औरंगाबाद येथे १२.३० ते १ वाजेदरम्यान डेमू आल्यानंतर तिला परत मनमाडसाठी पाठवावे. सायंकाळी पुन्हा मनमाडहून जालन्यासाठी रवाना केले जावे. यामुळे दुपारी १.३० ते २.३० दरम्यान मनमाडकडे जाण्यासाठी डेमू उपलब्ध झाल्यास सचखंड व तपोवनवरील ताण कमी होईल.
डब्यांमध्ये घुसखोरी : तपोवन एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून अनारक्षित प्रवाशांची तिकिटे तपासण्यासाठी कुणीच तपासनीस येत नाही. आरक्षित डब्यातून औरंगाबाद स्थानकावर उतरणे महिलांसाठी कठीण होऊन जाते. सुरक्षा यंत्रणा वाढवून तिकीट तपासनिसांनी रेल्वेत नियमित प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करावी. रेल्वेते आरक्षण करून प्रवास करण्याचा काहीच फायदा होत नसल्याचे "तपोवन'च्या प्रवासावरून लक्षात येत असल्याचे प्रवासी कांचन सोनी यांनी सांगितले.