आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीबीस्टार - बीड बायपास रोडवर रेल्वेने सामानासाठी दिलेल्या जागेवर अकबर खान आणि त्यांच्या वारसदारांनी कब्जा करून केलेले अतिक्रमण आज मनपाने काढले. दोन जेसीबींच्या मदतीने सलग चार तास कारवाई करून तब्बल २२ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. अनेक वर्षांपासून असलेले हे अतिक्रमण कर्मचाऱ्यांचा आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन काढण्यात आले. येत्या १५ दिवसांत या काढलेल्या अतिक्रमणाची साफसफाई करा, अन्यथा पुन्हा कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही या वेळी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांंनी संबंधितांना दिला.
बीड बायपास रोडवरील गट क्रमांक २० मधील २३ एकर ३७ गुंठे जागेपैकी एकर जागा रेल्वे प्रशासनाची आहे. या जागेपैकी काही जागा मूळ मालक असलेल्या रेल्वे प्रशासनाने अकबरखाँ शहानूरखाँ यांना सामान ठेवण्यासाठी दिली होती. पुढे या जागेवर अकबरखाँ शहानूरखाँ त्यांच्या वारसदारांनी कायमचा कब्जा केला आणि त्यावर अतिक्रमण करून ही जागा अनेकांना परस्पर किरायाने दिली. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने या जागेप्रकरणी स्थगिती आदेश दिला असतानाही अतिक्रमणधारकाने या जागेचे हस्तांतरण त्यात अनेक बदल केले.

शिवेवरही कब्जा
चार वर्षांपूर्वी सर्व्हे क्रमांक २० या जागेसह गट क्रमांक ९१ १०७ तसेच गट २१ च्या शिवेवरही अकबरखाँ शहानूरखाँ यांच्या वारसदारांनी कब्जा करण्याचा इराद्याने आधी मुरमाचा भराव टाकून जागेचे सपाटीकरण केले. सर्व्हे क्रमांक २० मध्ये फरशी, मार्बल, मटण शॉप इतर दुकानदारांना जागा परस्पर किरायाने दिली.

नागरिकांचा पाठपुरावा
या विरोधात लगतच्या विद्यानगर येथील रहिवाशांनी मनपा, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, तसेच जागतिक बँक प्रकल्पापर्यंत अनेकदा तक्रारी केल्या होत्या. त्यावर प्रत्येक विभागाने फक्त नोटिसांचा साेपस्कार पार पाडला. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने विद्यानगरातील रहिवाशांच्या बाजूने कौल दिला. अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मनपाकडे बोट दाखवले. मनपाने पुन्हा पाहणी, पंचनामे अहवालांवर अहवाल आणि नोटिसा बजावत अतिक्रमणाकडे डोळेझाक केली.

प्रकरण डीबी स्टारकडे
यामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली. चमूने याप्रकरणी तक्रारदारांकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यांचा तंतोतंत अभ्यास करून जागेचा सातबारा, मूळ मंजूर रेखांकनाची परिपूर्ण शहानिशा केली. २२ मार्च २०१२ रोजी ‘ग्रा.पं. सदस्यांचा रस्त्यावर कब्जा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यावर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी ग्रामपंचायत विस्तार अधिकाऱ्यासह तातडीने पाहणी केली, गट क्रमांक ९१ १०७ वरील शिवेची मोजणी केली. त्यात शिवेवर अतिक्रमण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायतीने थातूरमातूर कारवाई केली; पण गट क्रमांक २० मनपाच्या हद्दीत असल्याने अतिक्रमण काढण्यास चालढकल सुरू केली. चमूने याप्रकरणी सलग पाच वर्षे पाठपुरावा सुरूच ठेवला होता. दरम्यान, मनपा अतिक्रमण विभागाला तहसीलदारांनी अतिक्रमण विभागाला कारवाईबाबत लेखी पत्र दिले होते. मात्र, याकडे मनपाने सपशेल कानाडोळा केला. त्यावर डीबी स्टारने पुन्हा २२ मे २०१२ रोजी ‘अतिक्रमण मान्य, कारवाई शून्य’ जुलै २०१३ रोजी ‘राजकारण्यांचे अतिक्रमण व्यवस्थेचे संरक्षण’ या मथळ्यांखाली वृत्ते प्रसिद्ध करून पाठपुरावा सुरूच ठेवला. याची नवे मनपा आयुक्त बकोरिया यांनी दखल घेतली आजची धडक कारवाई केली.
काय म्हणतात अधिकारी?
आयुक्तांच्या आदेशाने सलग चार तास कारवाई करून अतिक्रमण जमीनदोस्त केले. यात २२ दुकाने पाडली. तीन पदनिर्देशित अधिकारी, तीन इमारत निरीक्षक आणि २२ कर्मचाऱ्यांसह दोन जेसीबी, दोन वाहने होती. येत्या १५ दिवसांत काढलेल्या अतिक्रमणाची साफसफाई करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना दिल्या आहेत, अन्यथा पुन्हा कारवाई करू. सी.एम. अभंग, पदनिर्देशितअधिकारी.

बकोरियांनी प्रकरण मार्गी लावले
डीबीस्टारने सलग चार वर्षांपासून आमच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडली; पण प्रशासन दखल घेत नव्हते. अखेर डीबी स्टारने वाचा फोडलेल्या सर्व बातम्यांची कात्रणे आम्ही तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दाखवली होती. त्यांनी तत्काळ दखल घेत कारवाई सुरू केली होती; पण त्यानंतर त्यांची बदली झाली. यानंतर आम्ही बकोरिया यांची भेट घेतली. त्यांनी अखेर प्रकरण मार्गी लावले. पी.व्ही. औरंगाबादकर आणि इतर नागरिक
बातम्या आणखी आहेत...