आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Station News In Marathi, Aurangabad Model Railway Station Issue, Divya Marathi

औरंगाबाद मॉडेल रेल्वेस्थानकाच्या कामास विलंब; सीसीटीव्ही यंत्रणा कुचकामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसर्‍या टप्प्याचे काम निधीअभावी रखडले आहे. औरंगाबाद स्थानकामधून वर्षाकाठी रेल्वेला 43 कोटी 20 लाख रुपये महसूल मिळूनही मॉडेल स्थानकाच्या उभारणीसाठी विलंब होत आहे. स्थानकावरील लिफ्ट मार्चमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केली जाईल, असे यापूर्वीच जाहीर करूनही अद्याप लिफ्ट सुरू झाली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह अपंगांची परवड सुरू आहे. मॉडेल स्थानकाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी साडेचार कोटींची गरज आहे.

औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा समावेश मॉडेल स्थानकात केल्यानंतर नऊ कोटी रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले. पहिल्या टप्प्यात इमारतीचे काम झाले.दुसर्‍या टप्प्यात फूड प्लाझा, मल्टि फंक्शनल कॉम्प्लेक्स, लिफ्ट, स्वयंचलित पायर्‍या, यात्री गेस्ट हाऊस आदी कामांचा समावेश आहे. यातील केवळ फूड प्लाझाचे काम पूर्ण झालेले आहे. औरंगाबाद स्थानकासंबंधी सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे.

वर्षाला मिळतात 43 कोटी
औरंगाबाद स्थानकावरून दरदिवशी 30 हजार प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. आरक्षणाद्वारे तीन हजारांवर प्रवासी प्रवास करीत असून, चालू तिकीट काढणार्‍यांची संख्या 13,200 इतकी आहे. एप्रिल 2013 ते मार्च 2014 दरम्यान दरदिवशी सरासरी 12,495 प्रवाशांनी स्थानकावरून तिकीट काढल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. दरदिवशी आरक्षणाद्वारे साडेसहा लाखांचा महसूल मिळतो, तर तिकीट खिडकीवर 5 लाख 34 हजार 54 रुपयांचा महसूल मिळतो. दरदिवशी 12 लाखांचा महसूल औरंगाबाद स्थानकातून प्राप्त होतो. महिन्याला आरक्षण व स्थानकावरून मिळणारा महसूल 3 कोटी 60 लाख रुपये इतका आहे.