आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्थानकाची सुरक्षा केवळ ९ सीसीटीव्हीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराच्या रेल्वेस्थानकाची सुरक्षा रामभरोसे आहे. २५ ते ३० सीसीटीव्हींची गरज असताना केवळ ९ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतांश कॅमे-यांचा लपंडाव सुरू असतो. नवीन बिल्डिंग कॅमे-याविना आहे. आरक्षण विभागात कॅमे-यांची संख्या तोकडी आहे. यामुळे ऑनमध्ये तिकीट विक्रीचा धंदा जोरात सुरू असून पाकीटमारांचा सुळसुळाट वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, विदेशी पर्यटक प्रवाशांना दररोज धक्काबुक्कीचा सामना करावा लागत आहे. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून २४ तासांत ४२ रेल्वे आणि सुमारे ४० हजार प्रवासी ये-जा करतात.
प्रवाशांना सोडण्यासाठी येणा-यांची संख्या हजारात आहे. नवीन बिल्डिंगमध्ये सुरक्षा व्यवस्था अतिशय तोकडी आहे. जुन्या इमारतीत १६, नवीन ९, आरक्षण विभागात ४ ते ५ अशा ३० सीसीटीव्हींची गरज असताना केवळ ९ कॅमेरे सुरू आहेत. तेही चालू-बंद असतात. परिणामी, रेल्वेस्थानकावरील हालचाली टिपता येत नाहीत. रेल्वेत चढ-उतार करणा-यांचे पाकीट चोरीला जाण्याच्या घटना वाढत आहेत. ज्येष्ठांना तिकीट घेताना धक्काबुक्की, शिवीगाळ सहन करावी लागते.

सीसीटीव्ही लवकरच
सीसीटीव्हींची संख्या किती कमी आहे, हे मला आता सांगता येणार नाही; पण कॅमेरे बसवण्याचा प्लॅन तयार झाला आहे. लवकरात लवकर कॅमेरे बसवण्यात येतील.
मोहंमद इस्तियाज, सिक्युरिटी विभागप्रमुख, रेल्वे विभाग, नांदेड.

जाणीवपूर्वक हलगर्जीपणा
रेल्वेस्थानकावर ज्येष्ठ नागरिक, महिलांना धक्काबुक्की होते. सीसीटीव्ही लावले असते, तर यावर निर्बंध आले असते. त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पाठपुरावा करू.
ओमप्रकाश शर्मा, अध्यक्ष, रेल्वे विकास समिती.