आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फूटभर रूळ तुटला; रेल्वे अपघात टळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद/परसोडा - औरंगाबाद-लासूर मार्गावर पोटूळनजीक रेल्वे रुळाचा सुमारे फूटभर लांबीचा तुकडा तुटला. मात्र, ही बाब रेल्वे कर्मचार्‍यांच्या लक्षात आल्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेसचा भीषण अपघात टळला. शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. यामुळे आठ रेल्वे रोखून ठेवण्यात आल्या. उशिरापर्यंत 8 हजार प्रवासी विविध स्थानकांवर अडकले.

मनमाडहून निजामाबादला अजिंठा एक्स्प्रेस पोटूळ स्टेशनवर पोहोचली. तेथून पुढे जाताच काही कि.मी.वर किमान एक फूट लांबीचा रुळाचा तुकडा पडला. गाडी पुढे निघून गेल्यावर जोरदार आवाज झाला. मागाहून जाणार्‍या मालगाडी चालकाच्या हे लक्षात आले. त्याने स्थानकाशी संपर्क साधून घटना कळवली. त्यानंतर पोटूळचे कर्मचारी धावले. मनमाड, नाशिक, मुंबई स्थानकांना घटनेची माहिती देण्यात आली. चालकांना नजिकच्या स्थानकांवर थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. नांदेड येथील रेल्वे विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकारी डॉ. ए. बी. पगारे यांनी सांगितले की, मुंबईकडे जाणारी देवगिरी औरंगाबाद येथेच रात्री 12 वाजेपर्यंत थांववण्यात आली. मुंबईहून नागपूरला जाणारी नंदीग्राम लासूर स्टेशन, तर मनमाड-काचीगुडा एक्स्प्रेस पोटूळला थांबवून नंतर औरंगाबादकडे पाठवली.

याशिवाय अजिंठा एक्स्प्रेसही पोटूळनजीकच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनमाड ते सिकंदराबाद मार्गावर आठ रेल्वे रोखण्यात आल्या होत्या.

150 कर्मचार्‍यांचे पथक
औरंगाबाद रेल्वे स्थानकातील अभियांत्रिकी विभागाचे सुमारे दीडशे कर्मचारी तातडीने पोटूळकडे रवाना करण्यात आले. त्यांनी पाच मिनिटांत पाहणी करून रूळ बदलला.

(फोटो : औरंगाबादेत ताटकळलेले प्रवासी.)