आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम नव्हे, नैसर्गिकच! 45 दिवसांनंतर वरुणराजा मेहरबान, खरिपाला जीवदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सलग तीन वर्षे दुष्काळाच्या झळा सोसत असलेला मराठवाडा कृत्रिम पाऊस पाडून भिजवण्याची तयारी असतानाच अखेर वरुणराजाच मेहरबान झाला आणि मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत मंगळवारी रिमझिम पाऊस बरसण्यास प्रारंभ झाला. सायंकाळनंतर अनेक भागात पावसाचा जोर वाढला. औरंगाबादेतही सकाळी नऊ वाजेपासूनच नैसर्गिक पावसाच्या रिमझिम सरी बरसल्या. रात्री अकरा वाजेपर्यंत २७.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील भूजल पातळी वाढण्यास मदत तर होणार आहेच; शिवाय जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टर शेतीतील कापूस, तूर आणि सोयाबीन या पिकांनाही त्याचा चांगला फायदा होणार आहे. दरम्यान, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाड्यावर पावसाळी ढगांनी गर्दी केली असून आज, उद्या आणि परवा विभागातील चांगला पाऊस होईल, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यानंतर दमदार पावसाचे आगमन झाले. सकाळी सात वाजेपासून रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. रात्री ८.३० वाजेपर्यंत चिकलठाणा वेधशाळेने १४.८ मिमी पावसाची नोंद घेतली. रात्री ९ नंतर पावसाचा जोर वाढला होता. १९ जुलैनंतरचा हा सर्वात मोठा पाऊस आहे. औरंगाबादबरोबरच नांदेड, परभणी, बीड, जालना, लातूर, हिंगोली आणि उस्मानाबादेतही पाऊस झाला. मंगळवारी शहरात तब्बल ४५ दिवसांनंतर पावसाळी वातावरण अनुभवायला मिळाले. त्यामुळे पावसाचा अनेकांनी आनंदही लुटला.

चर्चा कृत्रिम पावसाचीच...
गेल्या काही दिवसांपासून शहरात कृत्रिम पावसाची चर्चा आहे. त्यातच फ्लेअर्स मंगळवारी येणार असल्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे काम सुरू आहे. शहरात पडणारा पाऊस कोणता, याचीच चर्चा सर्वत्र सुरू होती. अनेक जण हा पाऊस कृत्रिम आहे का, अशी विचारणा करत होते. त्यामुळे नैसर्गिक पाऊस पडत असतानाही दिवसभर कृत्रिम पावसाची चर्चा झाली.

मराठवाड्यात सर्वदूर पाऊस
मराठवाड्यात मंगळवारी ढगाळ वातावरणामुळे बहुतांश जिल्ह्यांत सूर्यदर्शन झाले नाही. जालना, बीड,नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली.कमी दाबाचा पट्टा मराठवाड्यावर आल्याने हा पाऊस सुरू झाला.
भूजल पातळी वाढीसाठी पोषक पाऊस
मंगळवारी सकाळपासूनचा पाऊस भजल पातळी वाढवणारा आहे. सायंकाळपर्यंत झालेल्या पावसाने जमीन चांगली भिजली आहे. त्यामुळे पडणारा प्रत्येक थेंब कमीअधिक प्रमाणात भूगर्भात जातोच. मात्र, एवढा पाऊस पुरेसा नाही. आणखी किमान दोन दिवस तरी संततधारेची गरज आहे. -कैलास आहेर, वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ

साडेतीन लाख हेक्टरवरील पिके तगणार
हलक्या जमिनीतील पिकांनी दोन आठवड्यांपूर्वीच माना टाकल्या. मात्र, जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख हेक्टर चांगल्या जमिनीवरील कापूस, तूर, सोयाबीनला या पावसाचा फायदा होईल. पण आणखी पाऊस गरजेचा आहे. -एस. बी. शिरडकर, उपसंचालक, अात्मा

आज पुन्हा प्रयोग, पाच गावांमध्ये कृत्रिम पाऊस पाडल्याचा दावा
मराठवाड्याच्या बहुतांश भागात नैसर्गिक पावसाचे आगमन झालेले असतानाच मंगळवारीच शिरूर कासार तालुक्यातील तांबा राजुरी, लिंबागणेश, पाडळी , माजलगाव- गेवराई हद्द आणि नगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये सी डॉप्लर रडारशिवायच कृत्रिम पावसाचाही प्रयोग करण्यात आला. शेगावमध्ये १ ते दीड मिमी पाऊस झाला.. उर्वरित भागात किती पाऊस झाला याची माहिती बुधवारी कळेल.

हा प्रयोग यशस्वी झाल्याचा दावा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेत केला. कृत्रिम पावसासाठी राज्यात कायमस्वरूपी दोन केंद्रे उभारण्यात येणार असून एक केंद्र औरंगाबादमध्ये राहील, अशी घोषणा त्यांनी केली.बुधवारी दुपारी १२.३० वाजता पुन्हा बीड, उर्वरित. पान १२
उस्मानाबाद, लातूर या ठिकाणी अडीच तास कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे.
मंगळवारी दुपारी १ वाजून दहा मिनिटांनी कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी चिकलठाणा विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. खडसे यांनी सांिगतले की, दुपारी तीन वाजेपर्यंत ट्रायल रनचा प्रयोग चालला. ज्या भागात सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आहे, अशा ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. या प्रयोगादरम्यान २० फ्लेअर्सचा वापरल्या. मंगळवारी औरंगाबाद शहराच्या आग्नेय भागात जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत ट्रायल रन पूर्ण करण्यात आले असून पाच ठिकाणी ढगाची पर्जन्यमानता पाहून हा प्रयोग केला. दरम्यान, शेवगाव वगळता इतर किती ठिकाणी पाऊस झाला, याची माहिती बुधवारी कळणार असून त्यानुसार त्याचा पिकांना किती फायदा झाला, याची माहिती मिळणार आहे.

या प्रयोगासाठी २७ कोटींचा खर्च लागणार असून विमान २०० तासांची उड्डाणे करणार आहे. त्यापैकी १०० तासांची उड्डाणे कंपनीकडून विनामोबदला करण्यात येणार आहेत. हा प्रयोग तीन महिने चालणार आहे. पाऊस पाडण्यासाठी एका दिवसाचा खर्च सत्तर हजार ते एक लाखापर्यंत अाहे. या वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रयोग करत असलो तरी कायमस्वरूपी केंद्र उभारल्यामुळे पुढच्या वर्षी जूनमध्येच हा प्रयोग करण्यात येणार आहे, असे खडसे म्हणाले.
रडार येणार सहा ऑगस्टला
सी डॉपलर रडार सध्या हाँगकाँगला अडकून पडले आहे. गेले दोन दिवस मुंबईत येण्यासाठी कार्गो विमान नसल्यामुळे ते मुंबईत येऊ शकले नाही. सहा ऑगस्टला हे रडार औरंगाबादला येणार आहे. या रडारद्वारे २५० किमी हवाई अंतरामधील ढगाची उपलब्धता, त्यातील आर्द्रतेचे प्रमाण इत्यादी माहिती मिळते. रडारच्या परिक्षेत्रामध्ये संपूर्ण मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश होतो. या मॉडेलचा वापर करून विमान उड्डाणाची दिशा ठरवता येते. या पत्रकार परिषदेला महसूल सचिव गोविंदराज, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, उपायुक्त जितेंद्र पापळकर, नवनियुक्त जिल्हाधिकारी निधी पांडे आणि मावळते जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांची उपस्थिती होती.

राज्यातही हजेरी, आज- उद्या पाऊस
- राज्याच्या बहुतांश भागातही मंगळवारी ढगाळ हवामान होते, तर काही भागात तुरळक सरी कोसळल्या. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली.
- येत्या ४८ तासांत मराठवाड्याच्या बहुतांश भागासह उत्तर-मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली.