आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी जमिनीची तहान भागवतच जिरला पाऊस, हर्सूल तलाव कोरडेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जटवाडा येथून हसूल तलावात प्रवाह येत आहे. छाया मनोज पराती - Divya Marathi
जटवाडा येथून हसूल तलावात प्रवाह येत आहे. छाया मनोज पराती
औरंगाबाद - औरंगाबाद तालुक्यातील हर्सूल मंडळात आतापर्यंत सरासरीपेक्षा जवळपास निम्मा म्हणजे ३०९ मिलिमीटर पाऊस झाला. तो औरंगाबाद तालुक्यातील सर्वाधिक आहे. तरीही दोन लाख औरंगाबादकरांची तहान एक वर्षासाठी भागवणाऱ्या हर्सूल तलावाच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. गेल्या चार वर्षातील दुष्काळामुळे जमिनीची तहान भागवत जलप्रवाह पुढे सरकत असल्याने अशी स्थिती आली आहे. त्यात खाम नदी लगतच्या अतिक्रमणांची भर पडली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

६.२५ दलघमी क्षमतेचा हर्सूल तलाव यावर्षी पूर्ण कोरडा पडला होता. या तलावाला जडवाडा डोंगर तसेच नाल्यातून वाहणारे पाणी येते. जुलै आणि १०, ११ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे तलाव निम्मा तरी भरेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. चौका घाट आणि त्यालगतच्या डोंगरावरून अत्यल्प पाणी प्रवाह येत असून जटवाड्याकडून नजरेत येईल, एवढाच प्रवाह आहे.

पाच वर्षातील सर्वाधिक पाऊस : हर्सूल मंडळाची वर्षाची सरासरी साधारण ६५० मिमी इतकी आहे. आत्तापर्यंत ३०९ मिमी इतका पाऊस झाला आहे. यामध्ये दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे. रविवारी १० जुलै रोजी हर्सूल मंडळात ८२ मिमी पाऊस झाला आहे. तर जुलै रोजी ६५ मिमी पावसांची नोंद झाली होती. तर २०१५ मध्ये हर्सूल मंडळात एकूण पाऊस ५७४ मिमी इतका झाला होता. यामध्ये ११ जुलैपर्यत २०९ मिमी पाऊस झाला होता. तर २०१४ मध्ये १५ मिमी ( वार्षीक ३३८) तर २०१३ मध्ये २०१ ( ७३१) , २०१२ मध्ये ०० ( २३०) मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे आत्तापर्यत गेल्या पाच वर्षातला सर्वात मोठा पाऊस झाल्याची माहिती तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी दिली आहे. तलावाच्या वरच्या बाजूला जलयुक्त शिवार अंतर्गत कोणतेही काम झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तलाव आणि खाम नदी
जटवाड्याच्याडोंगररांगा भले उंचीला लहान असतील पण त्याच हर्सूल तलाव खाम नदीच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. जटवाड्याच्या डोंगरातून निघणारी खाम नदी धोपटेश्वर, जोगवाडा, इस्लापूरवाडी, गांवदरी, सुभाषनगर या गावांच्या बाजूने जात पुढे औरंगाबाद शहराच्या वेशीवर येते. हर्सूल तलाव ओव्हर फ्लो झाला तर सांडव्यातून वाहाणारे पाणी नाल्यावाटे पुढे खाम नदीला मिळते. हर्सूल तलावात येणारे पाणी मागच्या भागातून येते. एक मुख्य नाला जटवाड्याच्या डोंगरातूनच निघतो. तो जवळपास खाम नदीला समांतर आहे. त्याला आसपासच्या परिसरातील पावसाळी ओहोळ, ओढे छोटे नाले येऊन मिळतात. या शिवाय पूर्वेकडून चौकाच्या डोंगरांतूनही काही नाल्यांमधून येणारे पाणी या नाल्याला मिळते. अशा प्रकारे हर्सूलच्या तलावात पाणी येते.
अतिक्रमणाचा फटका
गेल्या चार वर्षातील दुष्काळामुळे आणखी एक-दोन पावसाचे पाणी जमिनीतच मुरणार आहे. डोंगरकड्यांवरून येणारे पाणी थेट तलावात येण्यासाठी आणखी जोरदार पाऊस लागतील. शिवाय खाम नदी, तलावाच्या वरच्या बाजूला बरीच अतिक्रमणे झाली. त्याचा फटका तलावालाच बसताे. -विजय दिवाण, जलतज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...