आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाच्या मार्‍याने भाजपचा दुष्काळी मोर्चा पांगला !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी भाजपतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चावर जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे आलेले कार्यकर्ते पांगले. तरीही प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पंकजा मुंडे यांनी भाषणे केली. बाबा-दादांना राज्यात विरोधी पक्षनेतेपदही मिळू देणार नाही, असा दावा फडणवीस यांनी केला, तर महायुतीवर मतांचा पाऊस पाडा, असे आवाहन मुंडे यांनी केले. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्याविना निघालेल्या पहिल्या मोर्चाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
नेत्यांनी पावसाकडे बोट दाखवले असले तरी भाजपमधील गटबाजीमुळे मराठवाड्यातून कार्यकर्ते आले नसल्याचे स्पष्ट दिसून आले. क्रांती चौकातून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. पैठण गेटला मोर्चेकऱ्यांना पावसाने गाठले. परिणामी अनेक कार्यकर्ते मिळेल त्या वाहनाने विभागीय आयुक्तालयाकडे निघून गेले. मंुडे, फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे, अतुल सावे आदी उघड्या जीपमधून उर्वरित आंदोलकांसोबत राहिले.
वर्दळीच्या रस्त्यावरून मोर्चा कशासाठी ?
औरंगाबाद-भाजपच्या मोर्चामुळे शुक्रवारी नागरिकांना भरपावसात त्रास सहन करावा लागला. लोकशाहीत प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याचा अर्थ नागरिकांचा छळ करणे असा होत नाही. सर्वच राजकीय पक्षांनी यापुढे आमखास मैदान ते विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय िकंवा मनपा मुख्यालय, पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली. मोर्चामुळे अडकून पडलेले योगेश धुमाळ म्हणाले की, वर्दळीचे रस्ते मोर्चाने अडल्याचा सर्वांना फटका बसतो. लोकांना त्रास देण्यासाठी मोर्चा आहे का, याचा विचार नेत्यांनी करावा. गोपाळ अष्टपुत्रे म्हणाले की, रस्त्यांचा वापर वाहतुकीसाठी आहे. मोर्चासाठी नाही, हे अजूनही राजकीय पक्षांच्या लक्षात आलेले नाही, हे आपले दुर्दैव आहे. दरम्यान, मोर्चाने लेबर कॉलनीत तासभर ट्रॅफिक जाम झाला होता.
गोपीनाथ मुंडेंची उणीव जाणवली
औरंगाबाद
- गेली २० वर्षे भाजपचे आंदोलन म्हटले की गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्व आणि मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते असे चित्र होते. आजच्या मोर्चात ते दोन्हीही दिसले नाही. गोपीनाथराव नसल्याने अपेक्षित संख्येने कार्यकर्ते आले नाहीत, असा सूर भाजपच्या गोटातून ऐकण्यास मिळाला. मुंडे १९९२ मध्ये विरोधी पक्षनेते झाले. त्या वेळी मुरली मनोहर जोशी भाजपचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात वविेकानंद महावदि्यालयाच्या प्रांगणात सभा झाली. त्यात नरेंद्र मोदी, मुंडेंचे औरंगाबादेतील पहिले राजकीय भाषण झाले. नंतरची आंदोलने त्यांच्याच नेतृत्वात झाली. माजी आमदार पाशा पटेल यांनी काढलेली शेतकरी पायी दिंडी मुंडेंचे औरंगाबादेतील शेवटचे आंदोलन ठरले. ७ ऑक्टोबर २०१३ रोजी राजनाथसिंहांच्या उपस्थितीत दिंडीचा समारोप झाला. मुंडे साहेबच नसल्याने आजच्या मोर्चाचे नमिंत्रण देण्यात आले नाही, असे पटेल यांनी सांगितले.