आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्जन्ययोग : पावसाने महाराष्ट्र व्यापला, मराठवाड्यात अत्यल्पच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने रविवारी मध्यरात्रीपासून सबंध महाराष्ट्र व्यापला आहे. कोकण, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात संततधार सुरू आहे. मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भ-खान्देशातही मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असला तरीही मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
कोकण, विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचे उशिराने आगमन झाले. मात्र चार दिवसांपासून दबा धरून बसलेला मान्सून रविवारी मध्यरात्रीपासून राज्यभर सक्रिय झाला. पुण्यासह पश्चिम व मध्य महाराष्ट्र, विदर्भ, खान्देशातह दमदार पाऊस झाला. पुढील दोन दिवस राज्यातील पावसाचा हा जोम कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

इगतपुरीत मुसळधार
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे घोटी आणि कोळस्ते यांना जोडणारा दारणा नदीवरील जुना पूल वाहून गेल्याने कोळस्तेकडील १५ गावांचा संपर्क तुटला आहे.

खान्देशात जोमदार
खान्देशात जोमदार पाउस होत असून रविवारी रात्री भुसावळ व परिसरात अवघ्या अडीच तासांत १३६.८ मिमी पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे आठ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून १७१.३३ क्युसेक वेगाने विसर्ग होत आहे. जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात संततधार :
नागपूरसह विदर्भात गेल्या दोन-तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. चंद्रपूर शहरातील इरई तसेच गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीला पूर आला आहे. तर, नदी-नाले दुथडी भरून वाहत असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात गेल्या २४ तासांत अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत पाऊस झाला. वाशीम व बुलडाणाया दोन जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे.

"भंडारदर्‍या'त १२४ दलघफू वाढ
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे सोमवारी १६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रतनवाडी, पांजरे येथेही जोरदार वृष्टी झाली. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात १२४ दशलक्ष घनफुटाने वाढ झाली. सध्या भंडारदरा धरणातून ४७२ क्युसेक पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले आहे.

भंडारदराची एकूण क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट आहे. सोमवारी सकाळपर्यंत पाणीसाठा १ हजार ९२ दशलक्ष घनफूट झाला. २४ तासांत धरणात १२४ दलघफू आवक झाली. घाटघर जलाशयाचे दोन्ही गेट उघडले असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

(फोटो : नागपुरात दोन दिवसांपासून पावसाने झड लावल्याने शहरात जागोजागी पाणी साचले. काही घरांतही पाणी शिरले होते.)