आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृद्‍गंध दरवळला! मान्सूनचे शुभसंकेत!!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गेल्या आठ दिवसांपासून सूर्य तळपू लागल्याने अंगाची लाही लाही होत असताना आज (शुक्रवारी) अचानक वातावरण बदलले. रात्री साडेनऊच्या सुमारास पावसाच्या मंद सरी कोसळल्या आणि अर्धचिंब भिजलेल्या मातीचा हवाहवासा सुगंध दरवळला. या मृद्गंधाने वातावरण भारल्यागत झाले. हवेत गारवा निर्माण झाल्याने वातावरण आल्हाददायक वाटत होते. मार्चमध्ये असा बदल अपेक्षित असला तरी तो नेहमी होतोच असे नाही. तथापि, मंद सरींचा पाऊस हे मान्सूनसाठी शुभसंकेत असल्याचे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे.

अटलांटिक समुद्र आणि हिंदी महासागरावरून वाहणार्‍या उबदार वार्‍यांचा संगम होत असल्याने गारपीट आणि पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला होता, तो शुक्रवारी खरा ठरला. विजांच्या कडकडाटात रात्री शहरात हलका पाऊस पडला. पुढील आठवड्यात गारपीट आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. मार्च महिन्यात हवामानात अनपेक्षित बदल होतात. त्याला नैसर्गिक परिक्रमा असे म्हणतात. सौदी अरेबिया, तिबेट, अटलांटिक आणि हिंदी महासागरातून वाहणार्‍या वार्‍यांमुळे तीन हजार किलोमीटरचा व्यासाच्या क्षेत्रामधील वातावरणात बदल झाला आहे. हिंदी महासागरावर पर्जन्ययोग्य वातावरण तयार झाल्याने आपल्याकडे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. आणखी तीन ते चार दिवस असेच वातावरण राहील, असे हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.