आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजा बरसला, पण कोसळला नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आठवडाभरापासून पाऊस नसल्याने पुन्हा चेहरे चिंताग्रस्त बनले. आज सकाळीच पर्जन्यसुलभ वातावरण निर्माण झाले. आकाश ढगांनी आच्छादून गेले. भरदुपारी एक वाजताच जणू संध्याकाळचे सहा वाजल्याचा आभास होत होता. टपटप थेंबांचा पाऊस पडू लागला. वाटले आता चांगलाच बरसणार. रस्ते, नाले भरभरून वाहणार, शहर जलमय होणार..परंतु भ्रमनिरास झाला. रिमझिम पावसाशिवाय औरंगाबादकरांच्या वाट्याला काहीही आले नाही. दिवसभरात जेमतेम 12 मिमी पावसाची नोंद झाली.

तब्बल सात दिवसांच्या विरामानंतर बुधवारी दुपारी पावसाने शहरात हजेरी लावली खरी, पण चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणार्‍या शहरवासीयांचा मात्र हिरमोड झाला. जायकवाडी धरणात एक जूनपासून आतापर्यंत केवळ पंधरा दशलक्ष घनमीटर पाणी आले आहे. हे पाणी शहराला 17 दिवस पुरेल एवढे आहे. 25 जूननंतर शहरात समाधानकारक पाऊस झाला नाही. जोरदार कोसळेल असे वाटत असताना अनेकदा पावसाने हुलकावणी दिली. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास अर्धा तास रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे वातावरण अल्हाददायक झाले होते. शहरातील अनेक भागांत खड्डय़ांमध्ये पाणी साचले होते. वाहनचालकांची तारांबळ उडाली. आतापर्यंत मोठा पाऊस न झाल्याने हसरूल तलावात पाणी साचले नाही.

जायकवाडी शून्य टक्क्याखाली
जून महिना संपला तरी अजूनही जायकवाडी धरणातील पाणीसाठा शून्य टक्क्याच्या खाली आहे. जायकवाडीत आतापर्यंत केवळ 15.265 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. जून महिन्यापासून बाष्पीभवनाचा विचार केल्यास आतापर्यंत 13 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. शहराचा विचार केल्यास किमान 70 ते 80 दिवस पाणीपुरवठा होईल इतक्या पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. दररोज 0.30 दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. ढगाळ वातावरणामुळे बाष्पीभवन कमी होत आहे. मात्र, उन्हाळ्यात हेच प्रमाण साधारण 1.25 दलघमी इतके असते, अशी माहिती कडा विभागाचे शाखा अभियंता एन. हिरे यांनी दिली.