आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत चोवीस तास अखंड भुरभुर,17.5 मिमी पावसाची नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दोन दिवस उलटल्यानंतर शनिवारपासून पावसाची अखंड भुरभुर सुरू होती. शनिवारी सायंकाळी पाच वाजेपासून रविवारी मध्यरात्रीपर्यंत कधी वेग घेत, तर कधी रिमझिम पाऊस बरसला. चोवीस तासांत 17.5 मिमी पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. सततच्या रिपरिपीमुळे सिटी चौक पोलिस ठाण्यासमोरील लिंबाचे झाड उन्मळून पडले, तर हसरूलमध्ये वीजवाहिनी तुटली.

भिजपाऊस असल्याने खरिपातील पिकांची स्थिती चांगली आहे, पण जलसाठय़ांत जेमतेम पाणी साचले आहे. यामध्ये वाढ होण्यासाठी उर्वरित नक्षत्रात भरपूर पाऊस होईल, अशी आशा सर्वांना आहे. हवा प्रतितास 11 ते 12 किलोमीटर वेगाने वाहत आहे. लिंबाचे झाड उन्मळून पडले. यामुळे काही काळ लोकांना जाण्या-येण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. गेल्या वर्षी सात जून ते 25 ऑगस्टपर्यंत 333 मिमी पाऊस झाला होता, तर यंदाही त्याच कालावधीत 459 पाऊस झाला आहे.

अंबिकानगरात वीजवाहिनी तुटली
हसरूल परिसरातील अंबिकानगरमध्ये 11 केव्ही विद्युतवाहिनी तुटल्याने मोठा आवाज झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. वाहिनी तुटताच फीडर बंद होत असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दीड ते दोन तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

पारा 22.6 अंशांवर
गत चार दिवसांपासून आकाशात दाट ढगांचे आच्छादन व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने रविवारी (25 ऑगस्ट) तापमान 22.6 अंशांवर आले. त्यामुळे हिवाळ्यातील बोचर्‍या थंडीसारखा गारवा जाणवत होता.