आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस स्थिरावला : मराठवाड्यात 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/ पुणे - निम्मा पावसाळा संपत आल्यानंतर सोमवारी रात्रीपासून मान्सून सक्रिय झाल्यामुळे दुष्काळाच्या उंबरठय़ावर असलेल्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी दिवसभर मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची रिपरिप सुरूच होती. दिवसभरात मराठवाड्यात सरासरी 13.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. असे असले तरीही औरंगाबाद वगळता मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात अजून वार्षिक सरासरीच्या 25 टक्केही पाऊस झालेला नाही.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मात्र ताशी 7 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जायकवाडी धरण 10 टक्के भरले. दरम्यान, मराठवाड्यावर पावसाळी ढगांनी गर्दी केलेली असल्यामुळे येत्या 24 तासांत काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज पुण्याच्या वेधशाळेने वर्तवला आहे. मराठवाड्यात स्थिरावलेला मान्सून काही दिवस मुक्कामाला राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्राची दांडगाई
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नांदूर- मधमेश्वर धरणातून ताशी 22, 590 क्युसेक, दारणातून 8, 469, गंगापूरमधून 2,112, नागमठाणमधून 12,567 आणि भंडारदरा धरणातून 835 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्राने कालव्याद्वारे विसर्गाचे पाणी वळते करून घेतल्यामुळे जायकवाडी धरणात केवळ 7, 387 क्युसेक पाण्याचीच आवक होत आहे. उर्वरित पाणी पळवण्यात येत आहे.

मंगळवारचे पर्जन्यमान (मिलिमीटरमध्ये)
औरंगाबाद 10.36
जालना 7.36
परभणी 14.26
हिंगोली 22.23
नांदेड 20.83
बीड 8.85
लातूर 13.02
उस्मानाबाद 9.51

(फोटो : सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे औंढा नागनाथ मंदिरामध्ये सर्वत्र पाणी झाले. मंदिराला तळ्याचे स्वरूप आले होते. सोमवारी भाविकांना दर्शन घेण्यासाठीही पाण्यातूनच वाट काढावी लागली)