आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निम्म्या मराठवाड्यात वर्षांत प्रथमच सरासरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - यंदाच्या मोसमात पर्जन्यमानाने चांगली सुरुवात केली असली तरी मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. परिणामी या चार जिल्ह्यांत मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या खोळंबल्या आहेत. विभागातील उर्वरित चार जिल्ह्यांत मात्र सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने तिकडील चित्र समाधानकारक आहे, पण मराठवाड्यात निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

पाच वर्षांपासून मराठवाड्यात अवकृपा दाखवणाऱ्या पावसाने यंदाची सुरुवात चांगली केली. परंतु मृगाच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा हुलकावणीचा खेळ सुरू झाल्याने विभागातील चार जिल्ह्यांना मोठ्या पावसाची िनतांत आवश्यकता आहे. २३ जूनपर्यंत मराठवाड्यात सरासरी १११.८३ मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ११४.३४ मिमी इतका पाऊस पडला आहे. पण तो सगळीकडे सारख्या प्रमाणात बरसला नाही. विभागातील औरंगाबाद जिल्ह्यावर यंदा पावसाची चांगली मेहरनजर दिसते. तेथे १०० मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १६८ मिमी झाला आहे, तर जालन्यालाही सुखावणारा पाऊसकाळ आहे. जालन्यात १०६ अपेक्षित असताना १३१ मिमीपर्यंत बरसात झाली आहे. नांदेड आणि हिंगोलीमध्ये अनुक्रमे १५२ आणि १५४ मिमी पर्जन्यवृष्टी झाल्याने ती अपेक्षितपेक्षा २० टक्के जास्त आहे.

विभागातील परभणी ७६.६ (९७.७), बीड ७३.५७ (९८.१६), लातूर ७५.२६ (१११.४) आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत आजपर्यंत ७६.४९ (१२५.१९) पाऊस झाला. (कंसातील आकडे अपेक्षित पावसाचे आहेत). हे चार जिल्हे अपेक्षित पावसापासून दूर असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. लातूर िजल्ह्यात तर कुंभारी वारे वाहत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सोयाबीनचा पेरा सर्वाधिक
लातूर जिल्ह्यात यंदा सहा लाख ११ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन आहे. एकूण पेऱ्यात सोयाबीन चार लाख हेक्टर व्यापणार आहे. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख हजार १०० हेक्टर असून त्यात वाढ होऊन एक लाख १५ हजार हेक्टरवर पेरा होणार आहे. जवळपास ५० हजार हेक्टरवर ज्वारीचा पेरा होण्याचा अंदाज आहे. मुगाची १० हजार हेक्टरवर पेरणी होईल. उडदाचे क्षेत्र १२ हजार आहे. अन्य पिकांच्या क्षेत्रात मका ९०००, बाजरी २४००, भात २०००, भुईमूग १८०० आणि सूर्यफुलाची ८०० हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता िजल्हा परिषदेच्या कृषी िवभागाने व्यक्त केली आहे.

माहूरला सर्वाधिक पाऊस
पावसाचा लहरीपणा ठळकपणे दिसून येत आहे. काही ठिकाणी जोरदार, तर काही भागात नुसतेच वारे वाहत आहे. यंदा मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात सर्वाधिक २८६.५ तर सर्वात कमी पर्जन्यमान बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात २२.२७ मिमी झाले आहे.

लातूर जिल्ह्यात १० टक्के पेरण्या
लातूर जिल्ह्यातील जळकोट, उदगीर, देवणी या तालुक्यांत १०० मिमीच्या जवळपास पाऊस झाल्याने पेरण्यांना सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात एकूण साडेतीन टक्के पेरण्या झाल्या होत्या. दर बुधवारी पेरण्यांचा अहवाल प्रशासनाकडे येतो. त्यानुसार प्रत्यक्ष आकडेवारी २४ रोजी येईल. प्रत्यक्षात १० टक्के पेरणी झाल्याचा अंदाज आहे. - व्ही.व्ही. लहाने, जिल्हा कृषी अधिकारी, लातूर
बातम्या आणखी आहेत...