आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात अतिवृष्टी; राज्यात सर्वत्र पाऊस, देशभरात मान्सूनच्या सहा सिस्टिम कार्यरत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई तालुक्यातील आगरनांदूर येथील रस्त्यावर नदीचे पाणी आल्याने शिक्षकांना पुराच्या  पाण्यातून असा मार्ग काढावा लागला. - Divya Marathi
गेवराई तालुक्यातील आगरनांदूर येथील रस्त्यावर नदीचे पाणी आल्याने शिक्षकांना पुराच्या  पाण्यातून असा मार्ग काढावा लागला.
औरंगाबाद- देशभरात नैऋत्य मान्सूनच्या सहा सिस्टिम तयार झाल्याने शुक्रवारी महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागात पाऊस झाला. मराठवाड्यात २० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. विदर्भात ४ ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात १४ ठिकाणी अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शुक्रवारी पाऊस झाला. उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. हा पाऊस १२ सप्टेंबरपर्यंत मुक्कामी राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. राज्यात जवळपास १५ दिवसांच्या खंडानंतर पुनरागमन केलेल्या पावसामुळे रब्बीच्या आशा दुणावल्या आहेत.

राज्यात यंदा मान्सूनची चाल विस्मयकारक राहिली आहे. हमखास पावसाचा विभाग म्हणून ओळख असलेल्या विदर्भाला यंदा मान्सूनने गुंगारा दिला आहे. शुक्रवारपर्यंत विदर्भात पावसाने २९ टक्क्यांची तर मराठवाड्यात ९ टक्के तूट नोंदवली. नैऋत्य मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने विदर्भ व मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी विदर्भात मौदा, दिग्रससह अन्य ठिकाणी अतिवृष्टी  झाली. पश्चिम विदर्भाला अद्यापही पावसाची गरज आहे. मराठवाड्यात वाशी, भूम, बीड,उमरगा आदींसह २० मंडळांत अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रात बारामती (१३० मिमी),  पडेगाव (११० मिमी), खटाव, वडूज, मोहोळ, फलटण (प्रत्येकी ९० मिमी), अक्कलकोट, माळशिरस, मंगळवेढा (प्रत्येकी ८० मिमी), आटपाडी, कराड, सांगोला, सातारा, विटा, वाईत (७० मिमी )  अतिवृष्टी झाली. 

मराठवाड्यात जोरदार पाऊस
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण व औरंगाबाद तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. जालना जिल्ह्यात अंबड, बदनापूर, जालना, परतूर तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठ  व सेलू तालुक्यात पावसाने हजेरी लावली. हिगोली जिल्ह्यातील वसमत व औंढा नागनाथ येथे चांगला पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड, बिलोली, देगलूर, अर्धापूर येथे मध्यम पाऊस झाला. बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

देशभरात मान्सून सक्रिय 
शुक्रवारी देशात मान्सूनच्या सहा सिस्टिम कार्यरत झाल्याने सर्वत्र पाऊस झाला. वायव्य महाराष्ट्र ते तामिळनाडूपर्यंत  कमी दाबाचे द्रोणीय क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. उत्तर कर्नाटकच्या आतील भागात चक्रवात स्थिती, मान्सूनचा अक्ष जम्मू ते पूर्व आसामपर्यंत, नैऋत्य राजस्थानात चक्रवात स्थिती, पूर्व-पश्चिम भागात विरळ कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम उत्तर प्रदेशात चक्रवात स्थिती अशा रीतीने देशभर मान्सून सक्रिय झाला आहे.
 
उस्मानाबाद : रात्रभर दमदार, नद्या-नाल्यांना खळखळाट 
आठ-दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्याच्या विविध भागात गुरूवारपासून(दि.७) पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी रात्री तसेच शुक्रवारी दिवसभर दमदार पाऊस झाल्याने   अनेक गावांतील नद्यांना पूर आला आहे. तर प्रकल्पातील पाणीसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली असून, उस्मानाबाद शहरात शुक्रवारी तीन तासांत अतिवृष्टी झाली. उमरगा, लोहारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. अन्य भागातही रात्री ११ वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळपासूनच उमरगा, लोहारा भागात दमदार पाऊस सुरू झाला. दुपारी तीन वाजेच्या सुमारास उस्मानाबादेत दमदार पाऊस बरसला. या पावसाने खरिपाच्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. भूम तालुक्यातील ईट परिसरातील मकाचे पीक वादळी पावसाने आडवे झाले. अनेक गावांतील, शिवारातील नद्यांना पूर आल्याने  पाणीच पाणी झाले आहे. या पावसाचा रब्बीच्या पिकांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

जालना: तब्बल दोन तास धुवाधार
जिल्ह्यात १३ दिवसानंतर  बहुतांश भागात चांगला पाऊस झाला. जालना तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास जालना शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. जालना-औरंगाबाद रस्त्यावर नागेवाडी येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक जवळपास दीड तास ठप्प झाली होती. शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भोकरदन-जाफराबाद वगळता जिल्ह्यात इतरत्र जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अवघ्या तीन तासांत सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११ मिमी पावसाची नाेंद झाली. अंबड व जालना तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.  जालना शहर आणि परिसरात या वर्षीचा हा सर्वात मोठा पाऊस ठरला.   कुंडलिका नदीला पूर आला तर सीना नदीही दुथडी भरूुन वाहत होती. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.  जालना-औरंगाबाद रस्त्यावरील वाहतूक प्रभावित झालीच, शिवाय रेल्वेगाड्याही उशिराने धावत होत्या.

बीड : तीन तालुक्यांत धो धो बरसला; ७ मंडळांत मुबलक
चार दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील पाटोदा, बीड, आष्टी तालुक्यातील सात महसुली मंडळात  शुक्रवारी पहाटे अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४०६ .७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.  वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत ७५.७२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. बीड तालुक्यातील भंडारवाडी येथे वीज कोसळून तीन  बैल ठार झाले तर  पाटोदा तालुक्यातील दासखेड महसुली मंडळात जिल्ह्यात सर्वाधिक १०२ मी.मी. पाऊस झाला अाहे. कवडवाडी येथे एक गाय ठार झाली आहे. गेवराई तालुक्यात पावसामुळे तालुक्यातील गोविंदवाडी, मादळमोही, जव्हारवाडी ,चकलांबा, या लघु प्रकल्पांची पाणी पातळी वाढली आहे.  केज तालुक्यातील जिवाचीवाडी, वाघेबाभूळगाव हे लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत.  परंतु आणखी सात तलाव कोरडेच आहेत. वडवणी तालुक्यात पावसामुळे खरीप पिकांना धोका निर्माण झाला असला तरी  लक्ष्मीपूर, चिंचोटी, उपळी  तलावात जेमतेम पाणी साठा आहे.अप्पर कुंडलिका प्रकल्प भरला आहे. मात्र विहिरी,बोअर, छोटे छोटे बंधारे अजून कोरडेच आहेत. बीड शहरातही शुक्रवारी पहाटे अडीच वाजता मुसळधार पाऊस झाला.

लातूर: वादळामुळे पिकांचे नुकसान
लातूर शहर आणि जिल्ह्याच्या काही परिसरात गुरुवारी रात्री उशिरा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मात्र, तुरळक ठिकाणी पडलेल्या या पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी राज्यासह लातूरमध्येही अतिवृष्टी झाली होती. त्यानंतर मात्र पाऊस गायब झाला होता. उलट कडाक्याचे ऊन पडू लागले होते. आता पाऊस गेला असे वाटत असतानाच गुरुवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागात जोरदार वारे वाहिले आणि काही ठिकाणी जोराचा पाऊस पडला. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. 

हिंगोली: सरासरी ५५ टक्क्यांवर
थेंबे थेंबे तळे साचे, या म्हणी प्रमाणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्याची सरासरी गेल्या २५ दिवसांत झालेल्या पावसामुळे ५५.९४ टक्क्यांवर  गेली आहे, तर शुक्रवार सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण ६५.७० मिलिमीटर  म्हणजेच सरासरी १३.१४ मिलिमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. १९, २० ऑगस्ट रोजी हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात केवळ २५ दिवसांच्या काळातच ३० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या पावसाची सरासरी ४९८.९८ मिमी पाऊस झाला आहे.  जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी ४२ टक्क्यांवर गेली आहे. 

नांदेड: वीज पडून शेतकरी ठार
हदगाव तालुक्यातील तामसा सर्कलमधील मौजे वायपणा (बु.) येथील शेतकरी कोंडबा रामा सोनमणकर यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली.  कोंडबा सोनमणकर हे सायंकाळच्या सुमारास शेताकडे जात होते. त्यावेळी पाऊस सुरू होता. त्या दरम्यान त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यामध्ये त्यांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतला व गंभीर जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी महसूल व पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, शुक्रवारी नांदेड शहर व परिसरात कुठेही पाऊस नव्हता.
 
सबंधीत फोटो पहा पुढील स्‍लाईड वर...
बातम्या आणखी आहेत...