आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 2 दिवसात पावसाचे 11 बळी; 32 तालुक्यांत अतिवृष्टी, खरिपाला जीवदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/पुणे - मराठवाड्यात 2 दिवसात पावसाने 11 बळी घेतले आहेत. परभणी जिल्ह्यात 4 तर नांदेड जिल्ह्यात 3 तर औरंगाबादमध्ये 2 व बीडमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. सुमारे दीड महिन्याहून अधिक काळ दडी मारलेला पाऊस महाराष्ट्रात परतला असून दोन दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत चांगला पाऊस झाला. विशेषत: मराठवाड्यात रविवारी चालू हंगामातील सर्वात मोठा पाऊस झाल्याने अनेक भागांत पिकांना आधार झाला आहे. रविवारी मराठवाड्यात 32 तालुक्यांत अतिवृष्टी झाली. यात नांदेड आणि लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला. एकट्या नांदेड जिल्ह्यात 12 तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली.

(हेही वाचा...महाराष्ट्राचे रान झाले आबादानी, अाणखी 4 दिवस पावसाचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज )

मुदखेड तालुक्यात सर्वाधिक 199 मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील 170 मंडळांत गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान, रविवारी विभागात पुरामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. यात परभणी जिल्ह्यातील 3  तर नांदेड  आणि बीड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. एक जण वाहून गेला असून त्याचा शोध सुरू होता. गंगापूर तालुक्यातही तिघांचा मृत्यू झाला असून पैठण शहरात अडीचवर्षीय डबक्यात पडून मृत्यू झाला. दरम्यान, परतलेला हा पाऊस काही खरीप पिकांना जीवदान देणारा ठरेल, मात्र होरपळून गेलेल्या पिकांना त्याचा काही लाभ होणार नाही. या पावसाने रब्बीची चांगली पायाभरणी होईल.

पावसाने दडी मारल्याने कापूस, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख खरीप पिके हातातून जाण्याची भीती होती. मात्र, दोन दिवसांतील पावसाने थोडा आधार झाला आहे. फुले लागण्याच्या, तर काही ठिकाणी बोंडे लागण्याच्या अवस्थेतील कापसाला पावसाने बळ मिळाले. शेंगा लागण्याच्या अवस्थेतील सोयाबीन आता चांगले येऊ शकेल. या पावसाने तूर जोमदार येऊ शकते.

कमी दाबाचे क्षेत्र कायम : पुणे वेधशाळेच्या सूत्रांनुसार, आग्नेय विदर्भ आणि परीसरावरील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. जम्मू-काश्मिरच्या पुर्वेकडील चक्राकार वारे उत्तरेकडे सरकत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण, खान्देशावरील आभाळ टिकून असल्याने येत्या तीन- चार दिवस पावसाची शक्यता कायम आहे.
 
नांदेड लातूरात अतिवृष्टी
नादेंड आणि लातूरात मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात १०० मिमी तर लातूरमध्ये १०४ मिमी पाऊस झाला. बीड जिल्हातही ६८ मिमी पावसाची नोंद झाली.
 
अतिवृष्टी झालेले तालुके (आकडे मिमी मध्ये) : पूर्णा-६७, नांदेड १४४, मुखेड १९९, अर्धापूर १२२, भोकर ९९, उमरी १३०, कंधार ८५, लोहा ९८, देगलूर ६५, बिलोली १०८, धर्माबाद १२६, नायगाव १३४, मुखेड ११६, तर बीड जिल्ह्यात बीड ७४, पाटोदा ९७, गेवराई ६९, शिरुर कासार ८२, अंबाजोगाई ७५, केज ६५, लातूर ९५, औसा १३२, रेणापूर १०५, उद्गीर ९३, अहमदपूर ९३, चाकुर १२२, जळकोट ८१, निलंगा १०८, देवणी १०५, शि.अनंतपाळ १०८, उस्मानाबाद ९९, भूम ७६, वाशी ७१ मिमी पाऊस झाला आहे.

नांदेडमध्ये अतिरक्त जिल्हाधिकाऱ्याचे घर पाण्यात : नांदेडमधल्या स्नेहनगरमधील सरकारी निवासस्थानात राहणाऱ्या अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या घरात गुडघाभर पाणी
शिरले. त्यामुळे घरातले सर्व साहित्य पाण्याखाली होते.

विष्णुपुरीत रात्रीतून ४३% जलसाठा वाढ
नांदेडच्या विष्णुपुरी धरणात शनिवारी रात्री १० वाजता ११% जलसाठा होता. या मुसळधार पावसाने केवळ २४ तासांतच धरणातील पाणी ४३ टक्क्यांनी वाढून ५४.३४ टक्क्यांवर पोहोचले. जायकवाडीचा जलसाठा तीन टक्क्याने वाढून ५२.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे. जायकवाडी धरणातील एकूण पाणीसाठा १८७२.१३७ दलघमीवर पोहोचला आहे.

... हवामान खात्याचा अंदाज अखेर खरा ठरला!
हवामान खात्याने पावसाळ्याच्या प्रारंभी आणि नंतर व्यक्त केलेले अंदाज या हंगामात जुळले नाहीत. त्यामुळे या चार दिवसांतील पावसाचा अंदाज खरा ठरणार का, अशी शंका शेतकऱ्यांना होती. वेधशाळेने १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज खरा ठरल्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

चार दिवस पावसाचे
साेमवारी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हलक्या जमिनीवर रब्बी शक्य
५५ दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने हलक्या जमिनीतील खरीप पिकांनी माना टाकल्या. अशा क्षेत्रावर महिनाअखेरपासून ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी रब्बी ज्वारीची पेरणी करू शकतील. पेरण्यांसाठी सध्याचा पाऊस अतिशय उपयुक्त आहे.
- सु. ल. जाधव, कृषी विस्तार संचालक, महाराष्ट्र
 
नऊ जणांचा मृत्यू
महिन्यापेक्षा दीर्घ कालखंडाच्या प्रतीक्षेनंतर कोसळलेल्या पावसाने मराठवाड्यात ९ जणांचा बळी घेतला. परभणी ३, नांदेड २ तर औरंगाबाद जिल्ह्यात ४ जणांचा बळी या पावसाने घेतला. बीडमध्ये तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून एकाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. जालना जिल्ह्यातील ६ तर बीड जिल्ह्यातील २ गावांचा संपर्क तुटला होता. 
 
पुढील स्‍लाइडवर...लातूर, परभणी, नांदेड, परभणी, जालना, बीड, उस्‍मानाबाद आणि औरंगाबादमधील परिस्थिती...
बातम्या आणखी आहेत...