आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेची पूर्वसूचना दोन तास आधीच मिळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वीज कुठे कोसळू शकते याची माहिती आता अर्धा ते दोन तास अगोदर मिळणार आहे. बुधवारी चिकलठाणा वेधशाळेत वीजप्रवण यंत्रणा (लायटनिंग लोकेशन नेटवर्क) बसवण्यात आली. राज्यातील 20 ठिकाणी महिना अखेरपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होईल.

मागील तीन वर्षात वीज पडून मराठवाड्यातील 115 जणांचा मृत्यू झाला. जीवितहानी टाळण्यासाठी भविष्यात या यंत्रणेचा मोठा फायदा होणार आहे. वीज पडून दगावणार्‍यांची संख्या वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ठिकठिकाणी 30 वीज अटकाव यंत्रे बसवण्यात आली. मात्र वीज कुठे पडू शकते, वीज पडण्याचे प्रमाण का वाढले याचा अभ्यास करण्यासाठी तंत्रज्ञान बसवण्यात आले नव्हते. 2010 मध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हवामान विभागाकडे याबाबत विचारणा केली होती. तेव्हापासून तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरू होते. चिकलठाणा वेधशाळेत 9 ऑक्टोबरला हे तंत्रज्ञान बसवण्यात आले असल्याची माहिती वेधशाळेचे सहायक शास्त्रज्ञ पी. एस. साळवे यांनी दिली.

एसएमएसद्वारे देणार माहिती
भारतीय हवामान विभाग आणि भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था पुणे (विज्ञान मंत्रालय) यांच्या वतीने हे तंत्रज्ञान बसवण्याचे काम सुरू आहे. अर्थ नेटवर्क यूएसए या संस्थेने लायटनिंग लोकेशन नेटवर्क तंत्रज्ञान विकसित केले, तर पोल्यूशन कंट्रोल लिटेड या संस्थेने यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यातील 20 ठिकाणी यंत्रणा बसवल्यानंतर पुण्यातील आयआयटीएम संस्था त्या त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करून तेथील हवामान शास्त्रज्ञ, सहायक शास्त्रज्ञ व कर्मचार्‍यांना एमएमएसद्वारे पूर्वसूचना देणार असल्याची माहिती शास्त्रज्ञ डॉ. सुनील पवार यांनी दिली.

अशी आहे यंत्रणा
यंत्रणेला एक अँटेना आणि युजर जोडण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान 200 ते 250 कि.मी. अंतरावरील हवामानाची स्थिती, वीज किती क्षमतेने आणि कोणत्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे याची माहिती कळवणार आहे. पुणे येथील आयआयटीएम विभागाकडून हवामानाचा अभ्यास करून वीज पडण्याच्या अर्धा ते दोन तास पूर्वी पूर्वानुमान कळवण्यात येईल.