आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाने २ कोटींचे नुकसान, चिकलठाण्यात पूल वाहून गेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अौरंगाबाद - गुरुवारी दणक्यात पडलेल्या पावसाने शहरात किमान दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असून चिकलठाण्यातील एक नळकांडी पूल वाहून गेला, तर दोन पुलांचे नुकसान झाले आहे. शिवाय याच भागात स्मशानभूमीच्या भिंंतीचा भागही पडला आहे. पूल पडल्याने चिकलठाणा ते वरूड काझी परिसराचा संपर्क तुटला असून या मार्गावरून ये-जा करणा-यांना आता पुल दुरुस्त होईपर्यंत ३ किमीचा फेरा घ्यावा लागणार आहे.

गुरुवारी सायंकाळी औरंगाबादेत दणकेबाज पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत ६०.२ मिमी पाऊस पडला. या पावसाने शहरात मोठे नुकसान झाले असून शेकडो घरांत पाणी घुसले. याशिवाय जागोजाग पडझडही झाली. आज महापौर त्र्यंबक तुपे यांनी शहराच्या विविध भागांना भेटी देऊन पाहणी केली. या पावसामुळे चिकलठाण्यातील आठवडी बाजाराजवळच्या चौधरी काॅलनीमागील भागात असलेला नळकांडी पूल वाहून गेला. पाण्याचा प्रवाह एवढा ताकदवान होता की प्रवाहासोबत जमिनीचा मोठा भागही वाहून गेला. हा पूल जसा वाहून गेला तसेच वरच्या भागात असलेल्या दोन पुलांचेही मोठे नुकसान झाले आहे. पूल वाहून गेल्याने वरूड काझीसाठी शाॅर्टकट असणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.

साता-यात भिंत पाडणार
साता-यातील श्रीविहार काॅलनीत नाल्याच्या प्रवाहात बांधकाम केल्याने कालच्या पावसात अनेक घरांत पाणी घुसले. आज महापौरांनी या भागाला पुन्हा एकदा भेट देऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. जागा आपलीच आहे, असा त्या बिल्डरचा दावा असून त्याबाबत नंतर पाहू, आधी ही भिंत तुम्हीच पाडून घ्या व नागरिकांवर येणारे संकट दूर करा, असे महापौरांनी सांगितल्यावर सायंकाळी भिंत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. बालाजीनगर, भवानीनगर या भागातही काही घरांत पाणी घुसले होते. तसेेच अरिहंतनगर, संजयनगर, दादा काॅलनी व भवानीनगरच्या काही घरांना पावसाच्या पाण्याने धोका निर्माण झाला होता, असे महापौर म्हणाले.

लांबचा फेरा पडणार
वरूड काझी व परिसरात जाणा-यांना लांबचा फेरा पडणार आहे. याच पावसात आठवडी बाजाराजवळ असणारे शौचालय वाहून गेले, तसेच स्मशानभूमीच्या भिंतीचा भागही पडला. महापौरांनी या भागाला भेट देऊन पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश अधिका-यांना दिले. या कामासाठी किमान १६ लाख रुपये लागणार आहेत. शिवाय स्मशानभूमीच्या भिंतीसाठी निधीची तरतूद असून त्यातून लगेच काम सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

नुकसान खूप
महापौर म्हणाले की, पूल वाहून जाणे, शौचालय पडणे व भिंत पडणे यासह घरांत पाणी घुसून धान्य, घरगुती वस्तू यांचे नुकसान होण्याचे प्रकार खूप घडले असून या पावसाने अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान केले असावे. अनेक घरांत शुक्रवारीही दोन-दोन फूट पाणी होते.

औषधी भवनमुळे
औषधी भवनच्या मागील नाल्याच्या काठी बांधण्यात आलेल्या भिंतीमुळे पावसाचे पाणी तुंबले व ते घरात घुसले. भाजपचे कार्यकर्ते अजय चावरिया व इतरांनी नगरसेवक राजू तनवाणी व नंतर महापौर तुपे यांना फोन करून ही माहिती दिली. औषधी भवनाची ही भिंत पाडून टाका, अशी मागणी त्यांनी महापौर आल्यावर केली. या वेळी महापौरांसोबत आलेल्या अधिका-यांना उद्देशून स्थानिकांनी काही आरोप केल्याने महापौर भडकून िनघून गेले. नंतर ते म्हणाले की, आम्ही पाहणी करायला गेलो होतो. समोरच्या माणसांशी सन्मानाने बोलले पाहिजे. झाला प्रकार योग्य नव्हता.

भरपाईबाबत मौन
अनेक घरांतील धान्यही या पाण्यात भिजले, वाहून गेले. घरगुती वापराच्या वस्तू, मोटारींचे नुकसान झाले. या सर्वांना मनपा नुकसान भरपाई देणाार आहे का, या प्रश्नावर महापौर त्र्यंबक तुपे यांनी उत्तर देणे टाळले. त्यामुळे पावसात नुकसान झालेल्या नागरिकांना काही आर्थिक मदत मिळणार नाही, असे दिसते.
बातम्या आणखी आहेत...