आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पाऊस : गारांच्या पावसाने हाहाकार;शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यात बुधवारी वादळी वार्‍यासह गारपीट झाल्याने पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जालना जिल्ह्यात तुफान पावसात झाड उन्मळून पडल्याने महिलेचा मृत्यू झाला, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातही गुरे राखणार्‍या मुलाचा वीज पडून मृत्यू झाला. पाटोदा तालुक्यातील पाचेगाव पाचंग्री गावात वीज पडल्याने सीमाबाई तागड,जयराम कोकाटे, वाल्मीक कोकाटे भाजले. त्यातील गंभीर वाल्मीक कोकाटे यांचा उपचारादरम्यान बीडमध्ये मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्हाभरात वादळी वार्‍यासह गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. फुलंब्री, पैठण, वैजापूर, खुलताबाद तालुक्यांत पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, आंबा, मोसंबी आदी बागांचे नुकसान झाले.

पैठण तालुक्यातील ढोरकीन, बिडकीन, बालानगर, पाचोड, आडूळ, रजापूर, वाहेगाव या परिसरात जोरदार पाऊस झाला. फुलंब्री तालुक्यातील गणोरी, बाबरा, आळंद, वडोदबाजार, पीरबावडा या परिसरातही पाऊस पडला. सोयगाव तालुक्यात गारपिटीमुळे 9 विद्यार्थिनी जखमी झाल्या. वैजापूर तालुक्यातील शिऊरसह लाखनी, मांडकी, बायगाव, भायगाव, नांदगाव, चाडगाव, आदी गावांना पावसाने झोडपले. खुलताबाद शहरासह वेरूळमध्येही पाऊस झाला.

वीज पडून मुलाचा मृत्यू
उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत बुधवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. या पावसाने हाताशी आलेल्या गहू, हरभरा, ज्वारीच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, परंडा तालुक्यातील पारेवाडी येथील सचिन दत्तात्रय बालगुडे (16) हा शेतात गुरे चारत होता. पाऊस सुरू झाल्यामुळे तो शेजारच्या द्राक्षबागेत आडोशाला थांबला. त्यानंतर त्याच्या अंगावर वीज पडून तो जागीच ठार झाला.

झाड उन्मळून महिलेचा मृत्यू
शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे झाडाच्या आर्शयाखाली थांबलेल्या महिलेच्या अंगावर झाडच उन्मळून पडल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना जालना जिल्ह्यातील वलखेडा येथे घडली. यमुना आनंदराव जवरे (वाडगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती आनंदराव रमाजी जवरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.