आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain Water Harvesting, Latest News In Divya Marathi

दुष्काळापासून धडा, 28 टक्के जलफेरभरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या वर्षी दुष्काळाचा तडाखा सहन करणार्‍या जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस पडला असला, तरी भूगर्भातील जलपातळी खालावलेलीच आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे लोकांचा ओढा वाढला असला, तरी त्याचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत कमीच आहे. शिवाय सरकारी व निमसरकारी कार्यालये, कर्मचार्‍यांची निवासस्थाने, मोठय़ा व्यापारी संकुलांनी पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी यंत्रणाच उभारली नाही. ग्रामीण भागात तर पुनर्भरणाच्या यंत्रणेविषयी माहितीच नाही. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. दुसरीकडे जल पुनर्भरणासाठी सवलती देऊन किंवा कायदा करून काहीही होणार नाही. त्यापेक्षा नागरिकांत जलसाक्षरता वाढवण्याची गरज असल्याचे जलतज्ज्ञांनी सांगितले.
2010 मध्ये 761.8 मिमी, 2012 मध्ये 523 मिमी. पाऊस पडला. त्यामुळे भूजल पातळी आधीच्या तुलनेत 13 मीटरपर्यंत खाली गेली. बोअरवेल, विहिरी, तलाव कोरडे पडले होते. 1 जून 2013 ते 12 मार्च 2014 पर्यंत 1005.5 मिमी विक्रमी पाऊस होऊनही बहुतांश ठिकाणी जलपातळी सरासरी 200 फुटांपर्यंत खालावलेलीच आहे. (2000 पर्यंत याच भागांमध्ये 80 ते 90 फुटांवर पाणी होते.) कारण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार औरंगाबाद शहरात पावसाचे सरासरी 25 हजार कोटी लिटर पाणी पडते. त्यातील तीन हजार कोटी लिटर भूगर्भात जिरते. उर्वरित नाल्यांतून जायकवाडीत जाते. यंदाही तसाच प्रकार झाला आहे. म्हणूनच भूगर्भातील पाणीपातळी 9 मीटर खोलवर आहे. ज्या ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंग केले आहे, तेथे जलपातळी 8 मीटरवर आहे. वॉटर हार्वेस्टिंग केलेल्या भागात पाणीपातळी 11 ते 25 फुटांवर असल्याचे जलमित्र विजय केडिया यांनी सांगितले.
जलफेरभरणाचा केवळ कायदा करून फायदा नाही, नागरिकांनीच जलसाक्षर व्हायला हवे
औरंगाबाद शहराचा पाण्याचा प्रश्न केवळ पाणीटंचाई आणि पाणीपुरवठा एवढय़ापुरता मर्यादित नाही. तो अतिशय व्यापक आहे. कारण या शहराची भौगोलिक रचना अतिशय वेगळी आहे. काही ठिकाणी उंचावर वसाहती झाल्या आहेत, तर काही भाग खोलगट असून तेथे घरे बांधली गेली आहेत. पूर्वीच्या काळात हर्सूल तलाव आणि काही विहिरींतून पाणी मिळत होते. नहर-ए-अंबरीतूनही पुरवठा होत होता. जायकवाडीचे धरण बांधले गेल्यावर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून घरापर्यंत पाणी मिळू लागले. मुळात मुद्दा भूगर्भातील पाण्याचा आहे. एकेकाळी जमिनीखाली मुबलक पाणी होते, असे म्हटले जाते. त्यात तथ्य आहे. मात्र, त्या वेळी विहिरींचे पाणी पुरेसे पडेल एवढीच लोकसंख्या होती. आता त्यात प्रचंड वाढ झाली.
त्यामुळे विहिरींच्या, भूगर्भातील पाण्यावर कितपत अवलंबून राहायचे, असा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शहराची भौगोलिक रचना पावसाचे पाणी जमिनीत पूर्णपणे मुरेल अशी नाही. देवगिरी महाविद्यालयाच्या जिओ फोरम संघटनेने अतिशय सखोल अभ्यास करून वस्तुस्थिती मांडली आहे. त्यानुसार औरंगाबादेतील केवळ 30 टक्के भूभाग पावसाचे पाणी मुरवण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच 70 टक्के भागात तुम्ही रूफ वॉटर हार्वेस्टिंग केले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. याचाच दुसरा थेट अर्थ असाही आहे की, यापुढील काळात पाण्याच्या संकटाशी लढायचे असेल तर महापालिकेची सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणा अतिशय सक्षम करावी. ठिकठिकाणची गळती बंद करून पाण्याचा थेंबन्थेंब लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आणि लोकांनीही उपलब्ध पाणी काटकसरीनेच वापरावे.