आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rain Water Harvesting Proposation Five Percent In Aurangabad City

औरंगाबाद शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रमाण अवघे पाच टक्के

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबादकरांना वर्षाला जेवढे पाणी लागते त्याच्या चौपट पाणी सरासरीएवढय़ा पावसामुळे येते आणि ते वाया जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंग करून हे पाणी वाचवता येत असले तरी नागरिकांच्या उदासीनतेमुळे आजघडीला शहरातील एकूण घरांपैकी अवघ्या 4 ते 5 टक्के घरांनी जल पुनर्भरण केले आहे. मनपाने यासाठी करात सवलतीची घोषणा करूनही काडीचा फायदा झालेला नाही.

पाण्याची चहूकडे ओरड सुरू असताना वारंवार प्रशासनाकडे बोट दाखवले जाते, पण रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबतीत एक बोट प्रशासनाकडे दाखवताना चारही बोटे आपल्या म्हणजे नागरिकांकडे असतात हे समोर आले आहे. शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रमाण काय याचा धांडोळा घेतला असता ही बाब समोर आली आहे. पाणी संपले, पाणी संपले अशी ओरड करताना उपलब्ध पाण्याचा वापर होत नसल्याचे समोर आले आहे.

‘वर्षाजल’ या रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करणार्‍या संस्थेचे विजय केडिया म्हणाले की, पाऊस हा पाण्याचा मोठा स्रोत आहे. औरंगाबादेत 1 हजार चौरस फुटांच्या छतावर साधारणपणे 70 हजार लिटर पाणी या पावसामुळे येते. त्यापैकी 80 टक्के पाणी पुनर्भरणाच्या माध्यमातून वाचवता आणि वापरता येऊ शकते हे सिद्ध झाले आहे. मात्र, जनतेत त्याबाबत फारशी जागरूकता नाही. घरांसोबत मोकळ्या जागा, उद्याने, मैदाने यांचाही जल पुनर्भरणासाठी वापर करायला हवा. मैदानांच्या आकारानुसार त्यावर पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे प्रमाण अधिक असते. हे पाणी चार्‍या अथवा शोषखड्डय़ांच्या माध्यमातून पुन्हा जमिनीत सोडल्यास पाणी पातळीत वाढ होते.

जलसाक्षरतेचे काम करणारे सुहास वैद्य म्हणाले की, छतावर पडणारे पावसाचे पाणी वाचवावे यासाठी फेरभरणाला प्रोत्साहन देण्याचे काम महानगरपालिकेने केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार्‍यांना मालमत्ता करात 5 टक्के सवलत देण्याचा ठराव मनपाने मंजूर केला आहे. शिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा असल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र मिळणार नाही, असा नियमही केला. म्हणजे कायदा आणि सवलत असे दोन उपाय मनपाने केले आहेत, पण नागरिक गंभीर नाहीत हे सत्य आहे. शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार्‍यांची संख्या 5 टक्क्यांच्या वर नाही. अवघ्या अडीच ते सात हजार रुपयांत रेन वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकते. यासाठी पाइप, वाळू, विटा किंवा कोळसा यापलीकडे फार काही लागत नाही, असे केल्याने माझ्या हापशाचे पाणी वाढेल का, असा प्रश्न विचारला जातो. वास्तविक हे पाणी जमिनीत मुरणार आहे. त्यातून भूगर्भाखालील पाण्याचा स्रोत मजबूत होणार आहे. सर्वांनी हे काम केल्यास त्याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.