आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेतून 13,500 कोटी लिटर पावसाचे पाणी गेले वाहून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मनपाची अनास्था आणखी एकदा समोर आली आहे. मनपाने अर्थसंकल्पात केलेली 30 लाखांची तरतूद कागदावरच र्मयादित राहिली, तर दुसरीकडे नागरिकांनी हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घेतला नसल्याने या दोन महिन्यांत पडलेल्या 15 हजार कोटी लिटर पावसाच्या पाण्यापैकी 13 हजार 500 कोटी लिटर पाणी वाहून गेले. विशेष म्हणजे शासकीय कार्यालये आणि पदाधिकार्‍यांच्या घरांवर वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आश्वासनही हवेत विरले आहे.

आतापर्यंत झालेल्या पावसापैकी केवळ 500 कोटी लिटर पाणी भूगर्भात गेले. एक हजार कोटी लिटर पाणी वातावरणात आद्र्रतेच्या स्वरूपात आहे. मान्सूनच्या उर्वरित दिवसांत किती जलपुनर्भरण होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येणार्‍या काळात आणखी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी मान्सूनमध्ये शहर आणि परिसरात 336 चौरस कि.मी. क्षेत्रफळामध्ये 25 हजार कोटी लिटर पाऊस पडतो. यापैकी तीन हजार कोटी लिटर पाणी नैसर्गिकरीत्या जलसाठय़ात मुरते.

सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी कमी होत आहे. पिण्यासाठी, सिंचन, उद्योग यासाठी पाण्याचा अर्मयाद उपसा केला जातो. त्यामुळे भूगर्भातील पातळी झपाट्याने खालावत आहे. यात वाढ करण्यासाठी हार्वेस्टिंग करणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. अशीच अनास्था राहिल्यास 2020 पर्यंत शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती जलतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

कायदाही रखडला
भूजल व्यवस्थापन कायदा-2009 राज्यसभा, लोकसभेत पारित झाला. तो राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवला. हा कायदा चार वर्षांपासून रखडला आहे. मंजुरी मिळाल्यास पर्जन्यमान कमी असलेल्या ठिकाणी जलपुनर्भरण बंधनकारक असेल.

आश्वासन हवेतच
महापौर कला ओझा आणि आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हार्वेस्टिंगची कामे हाती घेण्याचे आदेश दिले होते. परंतु दोन महिने उलटले तरी आश्वासनाची पूर्तता झाली नाही. ‘दिव्य मराठी’त 20 मे 2013 रोजी वृत्त प्रकाशित झाले होते.

..अन्यथा भीषण टंचाई
मनपाचे उदासीन धोरण आणि नागरिकांच्या अज्ञानामुळे मान्सूनच्या दोन महिन्यांत 13,500 कोटी लिटर पाणी वाहून गेले आहे. उर्वरित दोन महिन्यांत पडणारे पाणी तरी जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. असे ढिसाळ धोरण कायम राहिल्यास 2020 पर्यंत शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, हे निश्चित.
-विजय केडिया, जलतज्ज्ञ.

तातडीने आदेश देऊ
शासकीय कार्यालयांत हार्वेस्टिंग होणे आवश्यक होते. सोमवारी याबाबत बैठक घेऊन तातडीने काम सुरू करण्याचे आदेश देण्यात येतील.
-गोकुळ मवारे, प्रभारी आयुक्त मनपा.

प्रशासनाची दिरंगाई
मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात हार्वेस्टिंगचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाने दिरंगाई केली. स्थायीच्या बैठकीत याबाबत जाब विचारू.
-विकास जैन, माजी सभापती, स्थायी समिती.