आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात पाच दिवसांत बरसणार जलधारा, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्ह्यात या वर्षी जूनच्या पहिल्याच पंधरवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यामुळे ९० टक्के पेरणी पूर्ण झाली. पेरणीनंतर दमदार पाऊस झाल्याने सर्वच पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र २० जूनपासून पावसाने दडी मारली असून सूर्य पुन्हा आग ओकत आहे. तापमानाने जमिनीतील ओलावा दूर होत असून पाण्यावाचून पिके होरपळत आहेत.
त्यामुळे दमदार पावसाने पल्लवित झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा पावसाच्या मोठ्या खंडाने मावळत आहेत. मात्र, १० जुलैनंतर पुन्हा आशादायी चित्र दिसणार आहे. वातावरणातील होत असलेल्या बदलानुसार १० जुलैपासून मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
पाच वर्षानंतर यंदा मृग नक्षत्रात मान्सूनने जोरदार हजेरी लावली. २० जूनपर्यंत मध्यम ते दमदार पाऊस पडला. जुलैपर्यंत १६६.९६ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत १३ दिवसांतच १७३.८३ मिमी म्हणजेच १०४ टक्के पाऊस झाला. मुगाची ९४ टक्के, उडीद ८१, सोयाबीन १६१.१६, कपाशी ११५, मका ११२ टक्के पेरणी पूर्ण झाली. पिकांची उगवणही चांगली झाली. रान हिरवेगार झाले. पण १५ दिवसांपासून पाऊस नाही. कडक ऊन तापत असल्याने जमिनीतील ओलावा संपुष्टात येऊन पिके कोमेजू लागली. त्यांची वाढ खुंटली आहे. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे प्रमाण केवळ १६ टक्के आहे. उर्वरित ८४ टक्के शेतातील पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. मात्र येत्या पाच दिवसांत पाऊस झाल्यास सर्वच पिकांना जीवदान मिळून रखडलेल्या दहा टक्के पेरण्याही पूर्ण होतील.
१० जुलैनंतर पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता
- सध्या पावसासाठी अनुकूल स्थिती नाही. हवेचा वेग वाढला आहे. तापमानात वाढ झाली आहे. यामुळे बाष्पीभवन वेगाने होऊन जमिनीतील ओलावा, प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने खालावत आहे. ओल टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी हलक्या कोळपणीच्या पाळ्या द्याव्यात. आच्छादनाचा वापर करावा. ज्यांच्याकडे पाणी देण्याची व्यवस्था असेल अशांनी ड्रिप, स्प्रिंक्लरद्वारे पाणी द्यावे. मराठवाड्यात दहा जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
प्रा. प्रल्हाद जायभाये, मुख्यसमन्वयक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ग्रामीण हवामान शास्त्र