आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी वादळी पावसाने उडवली नागरिकांची दैना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हवामानात अनपेक्षित बदल झाल्याने शनिवारी शहरात वादळी वारे, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. हवेचा वेग प्रचंड असल्याने प्रारंभी उडालेली धूळ आणि नंतर विजांच्या कडकडाटात बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली.

पूर्व व मध्य भारतात हवेचा दाब कमी झाला आहे. तापमानात चढ-उतार होत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून वातावरणात मोठे बदल झाले आहेत. शुक्रवारी हवेचा वेग ताशी ५ किमीवरून २३ किमीवर पोहोचला होता. हलक्या पावसाच्या सरीही कोसळल्या होत्या. शनिवारी हवेचा दाब आणखी कमी झाल्याने ३.३० ते ४ वाजेपर्यंत शहर व परिसरात अवकाळी पाऊस पडला.

पिकांचे नुकसान; वीज गुल
दुपारी साडेतीननंतर झालेल्या पावसाने आंबा, द्राक्ष, डाळिंब, गहू, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर गारखेडा परिसर, चिकलठाणा, बायजीपुरा, औरंगपुरा, निराला बाजार, सातारा परिसर, हडको, सिडकोतील वीजपुरवठा खंडित झाला होता.
धुळीने जनजीवन विस्कळीत
ताशी 25 किमी वेगाने वारे वाहत असल्याने सर्वत्र धुळीचे लोट उठून जनजीवन विस्कळीत झाले होते. दुचाकीचालक आणि पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणे कठीण झाले होते. हवेच्या वेगामुळे दुचाकी, रिक्षा आदी वाहने मागे ढकलली जात होती. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली. एअर इंडिया कार्यालयासमोर दुभाजकावरील पथदिव्याचा खांब कोलमडला. सुदैवाने या वेळी काहीही अनर्थ घडला नाही. मात्र, हा खांब काढताना काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठाही विस्कळीत झाला होता.

घरांमध्ये शिरले पाणी
सिडको एन-5 येथील हॉटेल शिवासमोरील दोन-तीन घरांपुढे डबके साचले होते. साइड नाल्या तुंबल्याने प्रकाश पुजारी, नागूल यांच्या घरासमोर पाणी साचले. रस्त्याचे काम योग्य
रीतीने झाले नसल्याचे अशोक शिंगाडे यांनी सांगितले.