आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजरीवालांना जमले ते राज ठाकरेंना जमेना,रामदास आठवलेंचा भीमटोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - काँग्रेसच्या पाठिंब्यावर का होईना, दिल्लीत अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले. पण पुढे त्यांना सत्ता टिकवता आली नाही. मुख्यमंत्री होण्याची हौस मात्र त्यांनी पूर्ण करून घेतली. महाराष्ट्रात सत्तेत येण्याची भाषा करणार्‍या राज ठाकरे यांना मात्र हे अजूनही जमले नसल्याचा भीमटोला महायुतीचे नवनियुक्त खासदार रामदास आठवले यांनी लगावला. महायुतीत आणखी ‘भिडू’ घेणार नसल्याचेही त्यांनी रविवारी (16 फेब्रुवारी) जाहीर केले.


आठवले म्हणाले, ‘केजरीवाल यांनी कमी वेळेत दिल्लीत सत्ता आणली. ‘आप’सारख्या नवख्या पक्षाला प्रचंड यश मिळाले. राज ठाकरे यांच्या पक्षाला अजून हे साध्य करता आले नाही. महायुतीत आता आणखी नव्या ‘भिडू’ची आवश्यकता नाही. आपल्यालाच काही मिळते की नाही, अशी स्थिती असताना नव्याने येणार्‍यांना काय मिळेल, असा मिश्कील सवाल करत त्यांनी महायुतीचे दरवाजे बंद झाल्याचे जाहीर केले. शरद पवार यांना मात्र निवडणुकीनंतर लोकशाही आघाडीत आणण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लोकसभेबरोबर घेण्यासही त्यांनी विरोध दर्शवला.


संघाने हिंदू राष्ट्र निर्माणाचा अजेंडा बदलावा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू राष्ट्र संकल्पनेच्या अजेंड्यात बदल करून सर्वधर्मसमभावाचा अजेंडा अंगीकारावा, अशी सूचना आठवले यांनी केली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘नरेंद्र मोदींच्या धर्मांध मुखवट्यामुळे आघाडीला निवडणुकीनंतर मित्रपक्ष मिळणार नसल्याचे मान्य असले तरी मोदींनी आता विकासपुरुष म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली. त्याचा नक्कीच फायदा एनडीएला मिळेल आणि 300 पेक्षा अधिक जागा जिंकू.!’ असा दावाही त्यांनी केला. कार्याध्यक्ष बाबूराव कदम, माजी आमदार अनिल गोंडाणे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष अँड. ब्रह्मनंद चव्हाण, मजी जि. प. सदस्य मिलिंद शेळके, दौलत खरात, नगरसेवक सुरेश इंगळे, किशोर थोरात, एस. डी. मगरे, संजय ठोकळ, नागराज गायकवाड, प्रशांत शेगावकर, प्रकाश कांबळे आदींची या वेळी उपस्थिती होती.


अखेर दोन नगरसेवकांचा झाला प्रवेश
नगरसेवक सुरेश इंगळे आणि रामदास बोरडे यांच्यासह काही कार्यकर्ते रिपाइं (ए) मध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. त्यानुसार आज आठवलेंनी कार्यकर्त्यांचा प्रवेश जाहीर केला. पँथर्स रिपब्लिकनचे र्शावण गायकवाड, पुंजाराम जाधव, प्रकाश दाभाडे, शैलेंद्र मिसाळ यांचाही त्यामध्ये समावेश आहे. 20 फेब्रुवारी रोजी टीव्ही सेंटर मैदानावर सायंकाळी 4 वाजता जाहीर सोहळा होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.